कल्याण-डोंबिवली आणि दिवा-निळजे परिसरातील लाखो रेल्वे प्रवाशांच्या अडीअडचणी व प्रवासातील रोजच्या कसरतीवर मार्ग काढण्यासाठी भाजप महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष, आमदार रविंद्र चव्हाण यांनी आक्रमक आणि सकारात्मक पाऊल उचलले आहे. मध्य रेल्वेचे विभागीय रेल्वे प्रबंधक (DRM) हिरेश मीना यांच्यासोबत आमदार रविंद्र चव्हाण यांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) येथील मध्य रेल्वेच्या मुख्यालयात भेट घेतली.
शनिवार, २६ सप्टेंबर रोजी विविध रेल्वे प्रवासी संघटनांच्या प्रतिनिधींनी आमदार रविंद्र चव्हाण यांची भेट घेऊन आपल्या मागण्या मांडल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर प्रवाशांच्या मागण्यांना तडीस नेण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती.
बैठकीत नेमकी काय चर्चा झाली
पलावा परिसरातील वाढती लोकसंख्या लक्षात घेता गर्दीच्या वेळेत निळजे रेल्वे स्थानकातून थेट मुंबईकडे जाण्यासाठी दर तासाला किमान एक लोकल ट्रेन सुरू करण्याची आग्रही मागणी करण्यात आली.
गर्दीच्या वेळी डोंबिवली आणि दिवा स्थानकांतून थेट छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या दिशेने सुटणाऱ्या विशेष लोकल फेऱ्या सुरू करण्यावर भर देण्यात आला. मध्य रेल्वेच्या उपनगरीय मार्गावर सतत विलंबाने धावणाऱ्या गाड्यांमुळे प्रवाशांचे होणारे हाल रोखण्यासाठी वेळापत्रकाचे अचूक नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
स्थानकांनावरील वाढती गर्दी नियंत्रित करण्यासाठी सुरक्षा व्यवस्था अधिक बळकट करणे आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना अमलात आणण्यावर चर्चा झाली.
या बैठकीस लोढा पलावा परिसरातील 'कासा रियो अँड कासा रियो गोल्ड को-ऑप. हौ. सोसायटीज फेडरेशन'च्या वतीने सतीश सिंग उपस्थित होते.