Ravindra Chavan: "सोशल मीडियावर आपण कमी पडतोय"; रवींद्र चव्हाणांच्या नेते, पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या

केंद्र आणि राज्य सरकारच्या कल्याणकारी योजनांचा व विकासात्मक कामांचा प्रचार सोशल मीडियासह प्रत्यक्ष गाठीभेटींतून जनतेपर्यंत पोहोचवण्याचे कडक निर्देश रवींद्र चव्हाण यांनी कार्यकर्त्यांना दिले.

जाहिरात
Read Time: 2 mins

Nagpur News: आगामी नागपूर पदवीधर मतदारसंघाची निवडणूक अवघ्या चार महिन्यांवर येऊन ठेपलेली असताना भाजपने आतापासूनच जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. गेल्या निवडणुकीत भाजपला पहिल्यांदाच पराभवाचा सामना करावा लागला होता, याची जाणीव करून देत भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पूर्व विदर्भात दोन दिवसांत 6 संघटनात्मक बैठकांचा धडाका लावला.

नागपूरच्या एअरपोर्ट बँकवेट हॉल येथील अंतिम बैठकीत मंचावर राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, आमदार प्रवीण दटके, कृष्णा खोपडे, परिणय फुके आणि शहर अध्यक्ष दयाशंकर तिवारी उपस्थित असताना रवींद्र चव्हाण यांनी भाजप नेत्यांना व कार्यकर्त्यांना चांगलेच सुनावले.

Advertisement

"आपल्याला ही निवडणूक जिंकायची आहे का?" - रवींद्र चव्हाण

बैठकीची सुरुवात करतानाच रवींद्र चव्हाण यांनी "आपल्याला ही निवडणूक जिंकायची आहे का? आपली तशी इच्छा आहे का?" असा थेट सवाल विचारत उपस्थितांना अंतर्मुख केले. त्यानंतर डिजिटल प्लॅटफॉर्मवरील सक्रियतेवर बोट ठेवत ते म्हणाले, 80 टक्के कार्यकर्ते डिजिटलवर सक्रिय असल्याचे सांगत असले, तरी प्रत्यक्ष सोशल मीडिया प्रचारात भाजपची कामगिरी कमी पडत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री आणि केंद्रीय-राज्य मंत्र्यांनी घेतलेले मोठे निर्णय आकर्षक डिझाईन्स व पोस्टर्सद्वारे स्वतःचे नाव व पदासह नियमितपणे सोशल मीडिया पेजवर शेअर करून महाराष्ट्रात सकारात्मक वातावरण तयार केले पाहिजे.  नागरिक समस्या सांगतात तेव्हा त्या ऐकून घ्या, पण भाजप कार्यकर्ता म्हणून आपण सरकारच्या कामांबाबत आक्रमकपणे बोलले पाहिजे, असं देखील रवींद्र चव्हाण म्हणाले.

50 हजार नव्या पदवीधर मतदारांच्या नोंदणीचे लक्ष्य

रवींद्र चव्हाण यांनी नागपूर शहर, नागपूर ग्रामीण आणि वर्धा जिल्ह्यातील अंदाजे 12 लाख सुशिक्षित पदवीधरांचा उल्लेख करत पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना तातडीने कामाला लागण्याचे आदेश दिले. आगामी निवडणुकीत विजयाचा मार्ग सुकर करण्यासाठी किमान 50 हजार नवीन पदवीधर मतदारांची नोंदणी करून घ्यावी. केवळ डिजिटलवर न थांबता कार्यकर्त्यांनी, नगरसेवकांनी, बूथ प्रमुख आणि शक्तीकेंद्र प्रमुखांनी प्रत्यक्ष लोकांच्या गाठीभेटी वाढवाव्यात.

विकासकामे अन् राष्ट्रहिताचा अजेंडा जनतेपर्यंत न्या

आपल्या भाषणात पुढे बोलताना चव्हाण म्हणाले की, भाजप सत्तेसाठी नाही तर राष्ट्रहितासाठी राजकारणात आहे. पूर्वी राज्यात 14-14 तास लोडशेडिंग असायचे. आज 'वन नेशन, वन ग्रीड' योजनेमुळे वीज पुरवठा सुरळीत झाला आहे. जीएसटी (GST) आणि उद्योग क्षेत्रातील सुधारणा लोकांपर्यंत पोहोचवा. 2047 पर्यंत भारत विकसित देश बनवण्याच्या संकल्पनेत महाराष्ट्राचे योगदान आणि योजनांची माहिती जनतेला द्या. गेल्या निवडणुकीतील पराभवाचा डाग पुसण्यासाठी भाजपने आतापासूनच कंबर कसली असून, सोशल मीडिया आणि ग्राऊंड लेव्हलवर आक्रमक होण्याचे स्पष्ट संकेत रवींद्र चव्हाण यांनी दिले आहेत.

Advertisement

Topics mentioned in this article