यशपाल सोनकांबळे, प्रतिनिधी
Pune Supaul Express Pregnant Woman Viral News : पुणे-सुपौल एक्सप्रेसमध्ये प्रवास करणाऱ्या गर्भवती महिलेची धावत्या ट्रेनमध्ये सुरक्षित प्रसूती करण्यात आरपीएफ जवानांना यश आले. “ऑपरेशन मातृशक्ती” अंतर्गत मध्य रेल्वेच्या रेल्वे संरक्षण दलाने दाखवलेल्या तत्परतेमुळे आई आणि नवजात बाळ दोघांचेही प्राण वाचले. ही घटना पुणे-सुपौल एक्सप्रेसच्या गार्ड साइड जनरल कोचमध्ये घडली. प्रवासादरम्यान गर्भवती महिला रोक्साना खातून (वय 28, उत्तर प्रदेश) यांना अचानक तीव्र प्रसूती वेदना सुरू झाल्या. माहिती मिळताच अहिल्यानगर आरपीएफचे कॉन्स्टेबल सोमनाथ पाठाडे आणि हेड कॉन्स्टेबल विश्वजीत काकडे तातडीने मदतीसाठी धावले.
गंभीर परिस्थितीतही आरपीएफ जवानांनी शांतता आणि तत्परता दाखवत मदतकार्य सुरू ठेवले. याच दरम्यान महिलेने ट्रेनमध्येच एका निरोगी बाळाला जन्म दिला. त्यानंतर आई आणि नवजात बाळाला सुरक्षितपणे डब्याबाहेर काढण्यात आले. स्टेशन प्रशासनाच्या मदतीने तात्काळ 108 रुग्णवाहिका बोलावण्यात आली.
नक्की वाचा >> Pune News : पुणे जिल्ह्यातल्या 'या' भागात पाण्यासाठी रणकंदन, 27 वर्षे जुन्या पाणीपुरवठा योजनेविरोधात 'हंडा मोर्चा'
आई आणि बाळाची प्रकृती स्थिर
डॉ. प्रदीप सुरवसे आणि रुग्णवाहिका चालक मयूर बोले यांनी आई आणि बाळाला पुढील उपचारांसाठी अहिल्यानगर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. डॉक्टरांनी आई आणि बाळाची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले. रोक्साना खातून या पती जमील बेलावर यांच्यासोबत पुणे ते पंडित दीनदयाळ उपाध्याय जंक्शन असा प्रवास करत होत्या. आरपीएफ जवानांच्या तत्पर आणि माणुसकीपूर्ण मदतीबद्दल कुटुंबीयांनी रेल्वे प्रशासनाचे आभार मानले आहेत. या घटनेमुळे भारतीय रेल्वेचा संवेदनशील आणि मानवतावादी चेहरा पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे.
नक्की वाचा >> Pune News: पुण्यातील बुधवार पेठेत पोलिसांचं कोम्बिंग ऑपरेशन, रेड लाईट एरियातील 'त्या' 5 महिलांना अटक
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world