अजिंक्य धायगुडे पाटील, प्रतिनिधी
Pune Saswad Water Issue News : सासवड शहराला गेल्या अनेक वर्षांपासून भेडसावत असलेल्या तीव्र पाणीटंचाईच्या प्रश्नावर अखेर नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. शिवसेनेकडून आज भव्य ‘जनआक्रोश हंडा मोर्चा' काढण्यात आला. “पाणी हा नागरिकांचा मूलभूत हक्क असून, प्रशासनाच्या निष्क्रियतेची शिक्षा सासवडकरांना का भोगावी?” असा सवाल उपस्थित करत महिला, ज्येष्ठ नागरिक, युवक आणि विविध भागातील रहिवाशांनी मोठ्या संख्येने मोर्चात सहभाग घेतला.
सासवड शहरातील सध्याची पाणीपुरवठा योजना तब्बल 27 वर्षांपूर्वीची असून वाढती लोकसंख्या आणि शहराचा विस्तार लक्षात घेता ती पूर्णपणे अपुरी ठरत असल्याची तीव्र भावना नागरिकांनी व्यक्त केली. वारंवार होणाऱ्या गळती, तांत्रिक बिघाड आणि विस्कळीत नियोजनामुळे अनेक भागांत पाच-पाच दिवस पाणीपुरवठा होत नसल्याची तक्रार नागरिकांनी केली. नगरपरिषदेकडून ‘दिवसाआड पाणी'चे आश्वासन दिले जात असले तरी प्रत्यक्षात 5 ते 3 दिवस लागत आहेत उन्हाळ्यात संपूर्ण यंत्रणाच कोलमडल्याचे चित्र पाहायला मिळत असल्याचे शिवसेनेचे शहरप्रमुख मिलिंद इनामके यांनी सांगितले.
पाण्यासाठी महिलांना हंडे घेऊन तासन्तास रांगा लावाव्या लागत असून अनेकांना विकतचे पाणी घेण्याची वेळ आली आहे. काही भागांत दूषित पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचाही गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी नगरसेवक प्रितम म्हेत्रे यांनी व्यक्त केली.
नक्की वाचा >> Pune News: पुण्यातील बुधवार पेठेत पोलिसांचं कोम्बिंग ऑपरेशन, रेड लाईट एरियातील 'त्या' 5 महिलांना अटक
143 कोटी रुपयांच्या नवीन पाणीपुरवठा योजनेचं काय?
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून 2024 मध्ये मंजूर झालेल्या 143 कोटी रुपयांच्या नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम अद्याप सुरू झाले नसल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन निधी उपलब्ध असतानाही प्रशासकीय दिरंगाई आणि राजकीय श्रेयवादामुळे काम रखडल्याचा आरोप शिवसेनेचे गटनेते मंदार गिरमे आणि नगरसेवक बाळासाहेब भिंताडे यांनी केला.
सोमवारी सकाळी महात्मा फुले चौक येथून मोर्चाला सुरुवात झाली. मेन रोड व शिवतीर्थ चौक मार्गे हा मोर्चा सासवड नगरपरिषद कार्यालयावर धडकला. “143 कोटींच्या योजनेचे काम तातडीने सुरू करा”, “नियमित व शुद्ध पाणीपुरवठा करा” आणि “शहरासाठी कायमस्वरूपी जलनियोजन करा” अशा मागण्यांचे फलक हातात घेऊन आंदोलकांनी घोषणाबाजी केली. “सासवडकरांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका. पाण्यासारख्या मूलभूत प्रश्नावर आता नागरिकांना रस्त्यावर उतरावे लागत आहे, ही प्रशासनासाठी लाजिरवाणी बाब आहे,” असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला.
नक्की वाचा >> Ratnagiri News : मुंबईच्या तरुणाची मे महिन्याची सुट्टी ठरली शेवटची, कोकणात गावी गेला अन् भयंकर घडलं
या आंदोलनात नगरसेवक बाळासाहेब भिंताडे, राजेंद्र टकले, सचिन भोंडे, नगरसेविका दिपालीताई जगताप, शिल्पाताई जगताप, रत्नकाकी म्हेत्रे, हेमलता इनामके, माधुरी राऊत, माजी नगरसेवक दीपक टकले, मंगल म्हेत्रे, मयूर जगताप, अक्षयराज जगताप, संदीप जगताप, मंगेश भिंताडे, श्रीकांत टिळेकर, रोहित ताम्हाणे, राजू शिंदे, धनंजय म्हेत्रे आदींसह शिवसैनिक आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world