BMC Election 2026: मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या मतदानादरम्यान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (RSS) दोन उमेदवारांविरोधात राज्य निवडणूक आयोगाकडे धाव घेतली आहे. आपल्या नावाचा गैरवापर करून मतदारांची दिशाभूल केल्याचा आरोप करत या उमेदवारांची उमेदवारी रद्द करण्याची मागणी संघाने केली आहे.
मतदानाच्या प्रक्रियेदरम्यान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कोकण विभागाने दोन उमेदवारांच्या प्रचार पद्धतीवर तीव्र आक्षेप नोंदवला आहे. वॉर्ड क्रमांक 118 आणि 122 मधील दोन उमेदवारांनी स्वतःचा प्रचार करताना 'आरएसएस पुरस्कृत' असा उल्लेख केल्याचे समोर आले आहे.
कोणाविरुद्ध आहे तक्रार?
आरएसएसने निवडणूक आयोगाला दिलेल्या पत्रात खालील उमेदवारांची नावे नमूद केली आहेत. वैशाली जी (वॉर्ड क्रमांक 118), प्रशांत जी (वॉर्ड क्रमांक 122) हे दोन्ही उमेदवार देश जनहित पार्टी तर्फे निवडणूक लढवत आहेत.
(नक्की वाचा : BMC Election Result Exit Poll : बीएमसीचा 'किंग' कोण? भाजपची मुसंडी की ठाकरेंचा गड कायम; पाहा एक्झिट पोलचे आकडे )
संघाची अधिकृत भूमिका
आरएसएस कोकण विभागाचे प्रमुख विठ्ठल कांबळे यांनी स्वाक्षरी केलेल्या या पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे की, या उमेदवारांना संघाचे नाव वापरण्याची किंवा संघाचा पाठिंबा असल्याचे दर्शवण्याची कोणतीही अधिकृत परवानगी देण्यात आलेली नाही.
आरएसएस ही एक सांस्कृतिक संघटना असून ती कोणत्याही राजकीय पक्षाला किंवा वैयक्तिक उमेदवाराला अधिकृतपणे पाठिंबा देत नाही किंवा पुरस्कृत करत नाही. "उमेदवारांचे हे दावे खोटे असून मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा हा जाणीवपूर्वक केलेला प्रयत्न आहे," असे संघाने म्हटले आहे.
(नक्की वाचा : PMC Election Result Exit Poll : भाजपा विरुद्ध अजित पवार लढाईत पुण्याचा कारभारी कोण? वाचा एक्झिट पोलचा अंदाज )
कायदेशीर कारवाईची मागणी
निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन केल्याबद्दल या दोन्ही उमेदवारांची उमेदवारी रद्द करावी, अशी मागणी संघाने राज्य निवडणूक आयोगाकडे केली आहे. मतदानाची प्रक्रिया 15 जानेवारी रोजी पूर्ण झाली असून उद्या, 16 जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे. या तक्रारीवर आता निवडणूक आयोग काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.