PMC Election Result Exit Poll Update : पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या रणधुमाळीनंतर आता सर्वांच्या नजरा निकालांकडे लागल्या आहेत. विशेषतः मुंबईनंतर पुणे महापालिकेच्या सत्तेच्या चाव्या कोणाकडे जाणार, याची चर्चा गल्लीपासून दिल्लीपर्यंत सुरू झाली आहे. दरम्यान, विविध वृत्तवाहिन्या आणि संस्थांचे एक्झिट पोल समोर आले असून, यामध्ये पुण्यात कमळ फुलण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे.
अजित पवारांची प्रतिष्ठा पणाला
पुण्याचे पालकमंत्री म्हणून अजित पवार यांनी ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची केली होती. शहराचा कारभारी होण्यासाठी त्यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीशी हातमिळवणी करत सत्ताधारी भाजपावर जोरदार हल्लाबोल केला होता. मात्र, एक्झिट पोलची आकडेवारी पाहता अजित पवारांचे पुण्याचे स्वप्न अधुरे राहण्याची चिन्हे दिसत आहेत.
साम टीव्हीच्या एक्झिट पोलनुसार, भाजपाला पुण्यात सर्वाधिक 70 जागा मिळतील असा अंदाज आहे. तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 55 जागांवर समाधान मानावे लागू शकते. याव्यतिरिक्त शरद पवारांची राष्ट्रवादी 10, शिंदे सेना 12, काँग्रेस 08, ठाकरे सेना 05, मनसे 02 आणि इतरांना 03 जागा मिळण्याची शक्यता आहे.
( नक्की वाचा : BMC Election Result Exit Poll : बीएमसीचा 'किंग' कोण? भाजपची मुसंडी की ठाकरेंचा गड कायम; पाहा एक्झिट पोलचे आकडे )
भाजपाची सत्ता टिकणार की जाणार?
दुसरीकडे पीआरएबी एक्झिट पोलने भाजपाला मोठा दिलासा दिला आहे. या पोलनुसार पुण्यात भाजपाला 93 जागा मिळून स्पष्ट बहुमत मिळताना दिसत आहे. या पोलमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 43 जागा, शरद पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेसला प्रत्येकी 08 जागा देण्यात आल्या आहेत.
तर शिंदेंची शिवसेना 07 आणि ठाकरेंची शिवसेना 06 जागांवर विजयी होईल असा अंदाज आहे. 2017 मध्ये भाजपाने 98 जागा जिंकून एकहाती सत्ता मिळवली होती. यावेळी राष्ट्रवादीतील फूट आणि महाविकास आघाडीच्या आव्हानामुळे भाजपाच्या काही जागा कमी होताना दिसत असल्या तरी सत्ता मात्र त्यांच्याकडेच राहण्याची शक्यता आहे.
( नक्की वाचा : BMC Election Result Exit Poll मुंबईत 'महायुती'चाच बोलबाला; ठाकरे युतीचा प्रयोग फसला, वाचा सर्व एक्झिट पोलचे एकत्र कल )
पिंपरी चिंचवडमध्येही भाजपाचा जोर
पुण्याप्रमाणेच पिंपरी चिंचवडमध्येही भाजपा आणि अजित पवार यांच्यात थेट टक्कर पाहायला मिळाली. येथेही साम टीव्हीच्या पोलनुसार भाजपा 70 जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरताना दिसत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसला 42, शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 07, शिंदे सेनेला 05, मनसेला 02 आणि ठाकरे सेनेला 02 जागा मिळतील असा अंदाज आहे. जर हे एक्झिट पोल खरे ठरले, तर पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन्ही शहरांत अजित पवारांना मोठा धक्का बसू शकतो आणि भाजपा आपली सत्ता राखण्यात यशस्वी ठरू शकते.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world