Sahyadri Hospital Pune: डेक्कन परिसरातील ज्या जमिनीवर सह्याद्री ग्रुप ऑफ हॉस्पिटल्सने धर्मादाय रुग्णालय उभारले आहे, ती जमीन पुणे महानगरपालिकेचीच असल्याची माहिती सह्याद्रीने महानगरपालिकेला कळवली आहे. पुणे महापालिकेच्या जमिनीवर उभ्या असलेल्या या जमिनीवर कोकण मित्र मंडळ मेडिकल ट्रस्टने इमारत बांधल्याचीही माहिती देण्यात आली आहे.
( नक्की वाचा: सह्याद्री हॉस्पिटलची जागा ना विकता येणार ना भाड्याने देता येणार )
सह्याद्री हॉस्पिटल साखळी समूहातील मोठा हिस्सा मणिपाल हॉस्पिटलने विकत घेण्याचा निर्णय घेतला असून हा व्यवहार 6400 कोटींचा असणार आहे. सह्याद्री समूहातील मुख्य हॉस्पिटल असलेले डेक्कन परिसरातील सह्याद्री हॉस्पिटल महापालिकेच्या जमिनीवर उभे आहे. ही जमीन कोकण मित्र मंडळाला धर्मादाय वापरासाठी दीर्घकाळासाठी नाममात्र दरात भाड्याने देण्यात आली होती. ही जमीन कोणालाही विकता येणार नाही तसेच भाड्यानेही देता येणार नाही असे कराराच्या अटींमध्ये नमूद करण्यात आले होते, मग हा व्यवहार कसा काय होऊ शकतो असा प्रश्न विचारण्यात येऊ लागला होता. NDTV मराठीने याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर विविध यंत्रणा खडबडून जाग्या झाल्या होत्या.
महापालिकेच्या नोटीसला काय उत्तर आले?
17 जुलै रोजी पुणे महानगरपालिकेने सह्याद्री हॉस्पिटलला कारणे दाखवा नोटीस पाठवली होती. ही नोटीस वकिलांच्या सल्ल्यानुसार पाठवण्यात आली होती आणि त्याद्वारे हॉस्पिटल प्रशासनाकडून स्पष्टीकरण मागवले होते. सह्याद्री हॉस्पिटलने महानगरपालिकेला पुणे महानगरपालिका आणि कोकण मित्र मंडळ ट्रस्ट यांच्यातील मूळ भाडेकराराची प्रत सादर केली आहे. हा करार 99 वर्षांचा असून, पुणे महानगरपालिकेने ही जमीन ट्रस्टला दिली होती. ट्रस्टने स्पष्ट केले आहे की, रुग्णालयाची इमारत त्यांनीच उभारलेली आहे. सह्याद्रीकडून देण्यात आलेल्या उत्तरात असेही नमूद करण्यात आले आहे की, नर्सिंग होम लायसन्स रुग्णालयासाठी ट्रस्टच्या नावावरच आहे. हॉस्पिटलच्या प्रमुखांचे आणि बेड्सच्या संख्येत केलेले बदल महानगरपालिकेच्या अनुमतीनेच करण्यात आले आहेत. पुणे महानगरपालिकेच्या मोफत उपचार योजनेंतर्गत रुग्णांना सवलती दिल्या जातात. मागील 3 आर्थिक वर्षांत पुणे महानगरपालिकेच्या शिफारशीनुसार सरासरी 166 दिवसांपर्यंत 500 बेड्सवर मोफत उपचार झाले आहेत अशी माहितीही देण्यात आली आहे.
( नक्की वाचा: मराठी माणसाने उभ्या केलेल्या 'सह्याद्री' हॉस्पिटल साखळीची विक्री, 6,400 कोटींना झाला सौदा )
कराराचे पुढे काय होणार ?
करारातील अटीशर्तींनुसार ही जागा महापालिकेची असल्याने आणि ती दीर्घकालासाठी भाड्याने दिलेली असल्याने या जागेवरील हॉस्पिटल कसे काय विकले जाऊ शकते असा मूळ प्रश्न निर्माण झाला आहे. कायदेशीरदृष्ट्या विचार केला असता ही जागा विकणे शक्य नसल्याचे सांगितले जाते, यामुळे 6400 कोटींचा व्यवहारच अडचणीत येण्याची दाट शक्यता आहे.