Santosh Deshmukh Murder Case: बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्याकांडातील मुख्य सूत्रधार म्हणून आरोपी वाल्मिक कराड याचे नाव पुढे आले आहे. कराडच्या जामीन अर्जावर मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात शुक्रवारी झालेल्या सुनावणीत सरकारी वकील अमरजितसिंह गिरासे यांनी युक्तिवाद केला. न्यायमूर्ती एस. एम. घोडेस्वार यांच्या खंडपीठासमोर झालेल्या या सुनावणीदरम्यान सरकारी वकिलांनी बाजू मांडताना वाल्मिक कराड हाच या संपूर्ण कटाचा प्रमुख सूत्रधार असल्याचे ठामपणे सांगितले. सुनावणीदरम्यान संतोष देशमुख यांचे व्हिडीओ दाखवल्यामुळे देशमुख कुटुंबीयांसह न्यायालयात उपस्थित सारेच भावुक झाल्याचं पाहायला मिळालं.
सुनावणीदरम्यान देशमुख यांच्यावर झालेल्या अत्याचारांचे तब्बल 23 व्हिडिओ न्यायालयासमोर दाखवण्यात आले. ही दृश्ये पाहताच उपस्थित नागरिक, वकील आणि देशमुख यांचे कुटुंबीय अत्यंत भावुक झाले. पत्नी अश्विनी देशमुख आणि भाऊ धनंजय यांना आपले अश्रू अनावर झाले. मात्र आपल्या भावनिक होण्याचा न्यायालयीन प्रक्रियेवर कोणताही परिणाम होऊ नये याकरिता ते न्यायालयाबाहेर गेले. सुनावणीत पारदर्शकता राहावी आणि आपल्या भावनिक कृतीचा परिणाम निकालावर होतोय, असं कुणाल वाटू नये यासाठी, देशमुख कुटुंब न्यायालयाबाहेर गेल्याचं म्हटलं जात आहे.
(नक्की वाचा- VIDEO: नवले पुलावर वसंत मोरे थोडक्यात बचावले! फेसबुक लाईव्ह दरम्यानचा व्हिडीओ आला समोर)
बचाव पक्षाचा युक्तिवाद
आरोपी वाल्मिक कराडच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ शिरीष गुप्तेयांनी जामीन अर्ज दाखल केला. कराड यांचा या हत्याकांडाशी कोणताही संबंध नसून, त्यांना या प्रकरणात अन्यायाने गोवण्यात आले आहे, असा दावा बचाव पक्षाने केला. तसेच मोक्का कायदा चुकीचा लागू करण्यात आला आहे, असे कायदेशीर मुद्दे उपस्थित करण्यात आले.
(नक्की वाचा- PWD च्या 111 कोटींच्या घोटाळ्याच्या प्रकरणात नवा ट्विस्ट; भिवंडी कोर्टाच्या निकालाने आरोपी आणखी अडचणीत)
सरकारी वकिलांचा पुरावा आणि प्रतिवाद
सरकारी वकील गिरासे यांनी बचाव पक्षाच्या दाव्यांना प्रबळ प्रतिवाद केला. त्यांनी घटनेची प्रत्येक तारखेनुसार मांडणी करून ठोस पुरावे न्यायालयासमोर ठेवले: साक्षीदारांचे जबाब यावरून कराडच सूत्रधार असल्याचे स्पष्ट होते. मारहाणीदरम्यान कराड, घुले आणि विष्णू चाटे यांचे फोनवर सतत संपर्क सुरू होते, असाही पुरावा मांडण्यात आला. संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येने राज्यभर संतापाची लाट उसळली होती. या प्रकरणाची पुढील सुनावणी मंगळवार, दिनांक 16 डिसेंबर रोजी होणार आहे.
VIDEO