साताऱ्यातील डॉक्टर आत्महत्या प्रकरणात आता नवा ट्वीस्ट निर्माण झाला आहे. ही आत्महत्या नाही तर सुनियोजित हत्याच कशी होती याची थिअरी मांडण्यात आली आहे. ही थिअरी शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी काही पुरावे सादर करत मांडली आहे. त्यामुळे हे प्रकरण आता आणखी किचकत झाले आहे. सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषद घेत काही धक्कादायक खुलासे केले आहेत. शिवाय त्यांनी हे पुरावे देताना हे आत्महत्या नाही तर हत्या असल्याचा आपला आधी संशय होता. पण आता काही बाबी लक्षात घेता ही हत्याच आहे असं म्हणायला वाव आहे असा दावा ही त्यांनी केला आहे.
पुरावे सादर करताना त्यांनी पीडित डॉक्टर तरुणीच्या सुसाईड नोट आणि त्या आधी दिलेल्या तक्रारीचा हवाला दिला आहे. या डॉक्टर तरुणीने तिला होणाऱ्या त्रासाची एक तक्रार केली होती. ही तक्रार चार पानी होती. त्या तक्रारीत निरीक्षक हा शब्द तिने जवळपास नऊ वेळा लिहीला होता. त्यातील 'री'ची वेलांटी नऊ वेळा दुसरी होती. पण तिच्या हातावर मृत्यू पूर्वी जी सुसाईड नोट लिहीली आहे त्यात लिहीलेला निरीक्षक शब्दाची वेलांटी मात्र पहिली आहे. त्यामुळे ही हत्या असल्याचा आपल्याला पहिला फक्त संशय होता. पण आता या गोष्टी समोर आल्याने आता ही हत्या की आत्महत्या हे किचकट झालं आहे. हत्या झाली आहे असं बोलायला फारच पुरेसा वाव आहे असं ही अंधारे म्हणाले.
नक्की वाचा - Satara Doctor Case: डॉक्टर तरुणीच्या वडिलांना राहुल गांधींचा फोन, बोलणं काय झालं?
त्याच बरोबर तिने लिहीलेली तक्रार शिवाय आणि हातावरची सुसाईड नोट याचे हस्ताक्षरही जुळत नाही असा दावा अंधारे यांनी केला आहे. त्याबाबतचा रिपोर्ट आपण हस्ताक्षर तज्ज्ञांकडून मागवला आहे असं ही अंधारे म्हणाले. त्यानंतर आणखी काही गोष्टी स्पष्ट होवू शकतात. त्यात त्यांनी अजून एक थिअरी मांडली आहे. ज्या दिवशी पीडित डॉक्टर तरुणीचा मृत्यू झाला, त्यावेळी तिच्या बहिणीने फोन केला होता. तो फोन त्यावेळी पोलीसांकडे होता. पोलीसांनी तुमच्या बहिणीने संध्याकाळी सात वाजता आत्महत्या केली असल्याचं सांगण्यात आले. पण त्याच दिवशी डॉक्टर तरुणीच्या बहिणीने एक वॉट्सअप स्टेटस ठेवले होते. ते मात्र तिने रात्री अकरा वाजून सहा मिनिटांनी लाईक केले होते. असं असेल तर मृत्यूनंतरही बहिणीचं स्टेटस कुणी लाईक केलं असा प्रश्नही अंधारे यांनी उपस्थित केला.
जर डॉक्टर तरुणीने सात वाजताच आत्महत्या केली होती तर रात्री अकरा वाजता तिचा फोन कुणाकडे होता. ते स्टेटस कुणी लाईक केलं असे प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यामुळे पोलीस काय लपवत आहेत. ते कुणाला वाचवत आहेत अशी विचारणा अंधारे यांनी केला आहे. कुरूंदकर प्रकरणातही एका अक्षरामुळे संपूर्ण केसचा उलगडा झाला होता. त्यामुळे या केसचा ही तसाच उलगडा होवू शकतो असंही त्या म्हणाल्या. त्यामुळे या प्रकरणात संशय आणखी गडद झाला आहे. अशा स्थितीत त्यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावरही टीकेची झोड उठवली आहे.
सर्वांसमोर चाकणकर यांनी वॉट्सअप चॅटचे गोष्ट का सांगितली. त्या कुणाला वाचवत आहेत. तुम्ही कुणाची सुपारी घेतली आहे का? सुपाऱ्या वाजवताय का? असा सवाल ही त्यांनी चाकणकर यांना केला आहे. तुम्हाला महिलांसाठी आयोगाचं अध्यक्ष केलं आहे का कुणाला वाचवण्यासाठी केलं आहे. त्यामुळे अशा असंवेदनशील आयोगाच्या अध्यक्षांना तातडीने पदावरून हटवलं पाहीजे अशी मागणी ही सुषमा अंधारे यांनी केली आहे. या संपूर्ण बाबींमुळे पुन्हा एकदा संशयाची सुई ही पोलीसांच्या दिशेने गेले आहे. त्यामुळे या प्रकरणाचा तपास करताना पोलीसांचा कस लागणार आहे.