राहुल तपासे, प्रतिनिधी
American dollars garland for Bagad yatra : साताऱ्यातील वाई तालुक्यातील बावधन येथील प्रसिद्ध बगाड यात्रेला यंदा आंतरराष्ट्रीय रंग चढल्याचं पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या बगाड यात्रांपैकी एक असलेल्या या यात्रेत यंदा भैरवनाथावरील श्रद्धेचं एक वेगळंच उदाहरण समोर आलं आहे. एका भाविकाने चक्क अमेरिकन डॉलर्सची माळ बगाडाला अर्पण केली असून या अनोख्या अर्पणामुळे भाविकांमध्ये मोठी उत्सुकता पाहायला मिळत आहे. गेल्या ४०० ते ५०० वर्षांपासून ही बगाड यात्रा सुरू असल्याचं बावधनकरांकडून सांगितलं जातं.
अमेरिकन डॉलर्सच्या माळेमुळे मोठी चर्चा...
‘काशी नाथाच्या नावानं चांगभलं'च्या जयघोषात सध्या बावधनमध्ये बगाडाची मिरवणूक सुरू आहे. गावच्या वेशीवरील नदी परिसरातून सुरू झालेली ही पारंपरिक मिरवणूक गावातून मार्गक्रमण करत आहे. बगाड पाहण्यासाठी आणि भैरवनाथाचे दर्शन घेण्यासाठी हजारो भाविकांनी बावधनमध्ये गर्दी केली असून दुपारनंतर भाविकांची संख्या आणखी वाढताना दिसत आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदाही सकाळी अकरा वाजल्यापासून ते सायंकाळपर्यंत बगाडाला उंच खांबावर टांगण्याची परंपरा पार पडते. भैरवनाथाच्या भक्तीत तल्लीन झालेले भाविक आणि पारंपरिक जल्लोषामुळे बावधन गाव पूर्णपणे यात्रामय झाले आहे. यंदा बगाडावर अर्पण करण्यात आलेल्या अमेरिकन डॉलर्सच्या माळेमुळे या यात्रेची चर्चा केवळ सातारा जिल्ह्यातच नाही तर महाराष्ट्रासह परदेशातही रंगू लागली आहे.