यशपाल सोनकांबळे, पुणे
Pune News: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाने एक अत्यंत दिलासादायक निर्णय घेतला आहे. शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये राज्यातील ज्या तालुक्यांमध्ये अतिवृष्टी आणि पूरस्थिती निर्माण झाली होती, त्या भागातील पात्र विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्यात येणार आहे. विद्यापीठाने यासंदर्भातील अधिकृत निर्देश सर्व संलग्न महाविद्यालयांना जारी केले आहेत.
शासन निर्णयाची अंमलबजावणी
राज्य शासनाने 11 फेब्रुवारी 2026 रोजी निर्गमित केलेल्या परिपत्रकाच्या आधारावर विद्यापीठाने हा पाऊल उचलले आहे. या निर्णयाचा लाभ पुणे, अहिल्यानगर (नगर), नाशिक जिल्हा तसेच दादरा नगर हवेली येथील विद्यापीठाशी संलग्न असलेल्या सर्व महाविद्यालये आणि मान्यताप्राप्त संस्थांमधील विद्यार्थ्यांना होणार आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षण पूर्ण करताना आर्थिक अडचण येऊ नये, हा यामागचा मुख्य उद्देश आहे.
(नक्की वाचा- Thane News: ठाणेकरांची चिंता वाढली! 3 दिवसांत 6 मुले गायब, नेमकं काय घडतंय?)
महाविद्यालयांना निर्देश
विद्यापीठाने स्पष्ट केले आहे की, एकही पात्र विद्यार्थी या योजनेपासून वंचित राहता कामा नये. ज्या महाविद्यालयांनी अद्याप प्रक्रिया सुरू केलेली नाही, त्यांनी ती तातडीने पूर्ण करावी. विद्यार्थ्यांची माहिती भरण्यासाठी विद्यापीठाने विशेष लिंक उपलब्ध करून दिली आहे. ही माहिती भरण्यासाठी 6 मार्च ते 9 मार्च 2026 (दुपारी 12 वाजेपर्यंत) अशी मर्यादित मुदत देण्यात आली होती, ज्याची अंमलबजावणी आता अंतिम टप्प्यात आहे.
(नक्की वाचा- Chandrapur News: चंद्रपूर हादरलं! मोतीबिंदू शस्त्रक्रियेनंतर रुग्णांसोबत भयंकर घडलं; रुग्णालय सील)
परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक प्रा. डॉ. प्रभाकर देसाई यांनी या निर्णयाबाबत माहिती देताना सांगितले की, "आपत्तीग्रस्त विद्यार्थ्यांना आधार देणे ही विद्यापीठाची जबाबदारी आहे. या निर्णयामुळे शेकडो कुटुंबांना आर्थिक हातभार लागणार असून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यास मदत होईल."
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world