High Court News : एखाद्या तरुणीला किंवा महिलेला I love You म्हणणे लैंगिक छळ नाही, जोपर्यंत त्या शब्दांसोबत लैंगिक हेतू स्पष्टपणे दिसून येत नाही. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका खटल्याचा निकाल देताना ही टिप्पणी केली. एका अल्पवयीन मुलीच्या छेडछाडीच्या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने ही टीप्पणी केली आहे. या प्रकरणात, खंडपीठाने संबंधित तरुणाला निर्दोष मुक्त केले. तरुणाला निर्दोष मुक्त करताना खंडपीठाने म्हटले की, I love You म्हणणे लैंगिक अत्याचार असू शकत नाही.
नागपूरमधील काटोल येथील 25 वर्षीय पुरूषाला 17 वर्षीय मुलीचा छळ केल्याबद्दल तीन वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा सत्र न्यायालयाने सुनावली होती. उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातील न्यायालयाचे नेतृत्व करणाऱ्या न्यायमूर्ती उर्मिला जोशी-फाळके यांनी मात्र आरोपीची निर्दोष मुक्तता केली.
(नक्की वाचा - Mohammed Shami hasin Jahan case: मोहम्मद शमीला हायकोर्टाचा झटका! पत्नीला दरमहिना द्यावे लागणार लाखो रुपये, 7 वर्षांचं कर्जही)
न्यायमूर्ती उर्मिला जोशी-फाळके यांनी याबाबत म्हटले की, "'आय लव्ह यू' सारखे शब्द कायद्यानुसार 'लैंगिक अत्याचार करण्याचा हेतू' मानले जाऊ शकत नाहीत. एखादा व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीवर प्रेम करत असेल आणि आपल्या भावना व्यक्त करत असेल तर तो लैंगिक अत्याचार असू शकत नाही. जर बोललेले शब्द लैंगिक हेतू म्हणून मानले जात असतील, त्यासोबत अशी काहीतरी वर्तवणूक दिसली पाहिजे ज्यातून खरा हेतू स्पष्ट होईल."
काय आहे प्रकरण?
प्रकरण ऑक्टोबर 2015 रोजीचं आहे. फिर्यादी पक्षाच्या म्हणण्यानुसार, आरोपी तिच्या मोटारसायकलवरून तिच्या मागे गेला. त्याने तिचे नाव सांगण्याचा आग्रह धरला. त्यानंतर त्याने तिचा उजवा हात धरला आणि 'मी तुझ्यावर प्रेम करतो' असे म्हटले. पीडितेने घरी गेल्यावर घडलेला सगळा प्रकार पालकांना सांगितला. त्यावेळी तिच्या वडिलांनी पोलिसात तक्रार दाखल केली.
(नक्की वाचा - Niketan Dalal Death: देशाचे पहिले दिव्यांग आयर्नमॅन निकेत दलाल यांचा मृत्यू; हॉटेलमधील मुक्कामावेळी अनर्थ घडला)
तक्रारीवरून पोलिसांनी व्यक्तीवर भारतीय दंड संहितेच्या कलम 354 अ (लैंगिक छळ) आणि ३354 ड (पाठलाग करणे) तसेच पोक्सो कायद्याच्या कलम 8 अंतर्गत आरोप लावले. 2017 मध्ये, नागपूरच्या सत्र न्यायालयाने आरोपीला तीन वर्षांची सक्तमजुरी आणि 5000 रुपये दंडाची शिक्षा सुनावली होती.