
रेवती हिंगवे, पुणे
Pune News : 'स्मार्ट सिटी' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यातील रस्त्यांची दुरवस्था पुन्हा एकदा समोर आली आहे. शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांनी एका निष्पाप ज्येष्ठ नागरिकाचा बळी घेतल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. औंध परिसरातील राहुल हॉटेलसमोर हा अपघात झाला असून, यात जगन्नाथ काशिनाथ काळे या 61 वर्षीय नागरिकाचा मृत्यू झाला आहे. या अपघाताचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जगन्नाथ काशिनाथ काळे हे त्यांच्या गाडीवरून जात असताना औंध येथील राहुल हॉटेलसमोर असलेल्या रस्त्यावर रस्ता आणि पेव्हिंग ब्लॉकमध्ये खड्डा निर्माण झाला होता. याच खड्ड्यात त्यांची गाडी घसरली आणि त्यांचा तोल गेला. तोल गेल्यामुळे ते रस्त्यावर पडले. नेमक्या त्याच वेळी मागून भरधाव वेगाने येत असलेल्या एका कारच्या खाली ते चिरडले गेले.
(नक्की वाचा- VIDEO: हे वागणं बरं नव्हं! नवी मुंबई महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याचं मंत्र्यांसमोर लोटांगण)
नागरिकांमध्ये संतापाची लाट
या अपघातात गंभीर जखमी झालेल्या काळे यांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले, परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेमुळे शहरातील रस्त्यांच्या निकृष्ट दर्जाबद्दल नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. अनेक दिवसांपासून शहरातील विविध भागांत खड्डे आणि खराब रस्त्यांची समस्या असूनही पुणे महानगरपालिका आणि संबंधित प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिक करत आहेत.
(नक्की वाचा- Mumbai to Goa मुंबईकरांचं स्वप्न होणार पूर्ण, गोवा प्रवास होणार जलद! राज्य सरकारची महत्त्वाची घोषणा)
अपघाताचे संपूर्ण दृश्य परिसरातील एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, यामुळे प्रशासनावरील टीका आणखी तीव्र झाली आहे. नागरिकांनी प्रशासनाकडे रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे आणि या दुर्घटनेसाठी जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world