
राहुल कांबळे, नवी मुंबई
Navi Mumbai : नवी मुंबई महानगरपालिकेचे मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत जवादे यांच्या एका व्हायरल व्हिडीओमुळे सरकारी अधिकाऱ्यांच्या वर्तणुकीबद्दल जोरदार चर्चा सुरू झाली आहे. वाशी येथील एका सार्वजनिक कार्यक्रमात वनमंत्री गणेश नाईक यांच्या पाया पडतानाचा डॉ. जवादे यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने पसरत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नवी मुंबईतील वाशी येथे एका सार्वजनिक कार्यक्रमात वनमंत्री गणेश नाईक उपस्थित होते. त्यावेळी, त्यांच्या कार्यकर्त्यांनी पाया पडण्यास सुरुवात केली. नेमक्या त्याच वेळी हातात डायरी घेऊन उभे असलेले मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत जवादे यांनीही गणेश नाईक यांच्या पाया पडले. हा संपूर्ण प्रसंग तेथे उपस्थित असलेल्या काही नागरिकांनी त्यांच्या मोबाईलवर कैद केला आणि नंतर तो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.
(नक्की वाचा- Mumbai to Goa मुंबईकरांचं स्वप्न होणार पूर्ण, गोवा प्रवास होणार जलद! राज्य सरकारची महत्त्वाची घोषणा)
सरकारी अधिकाऱ्यांच्या प्रतिष्ठेवर प्रश्नचिन्ह
हा व्हिडीओ समोर आल्यानंतर सरकारी अधिकारी आणि त्यांचे राजकीय संबंध यावर मोठा वाद निर्माण झाला आहे. अनेक नागरिकांनी आणि सामाजिक संघटनांनी यावर तीव्र टीका केली आहे. त्यांचे म्हणणे आहे की, सार्वजनिक कार्यक्रमात मंत्रीपदाला अशा प्रकारे लोटांगण घालणे हे कोणत्याही शासकीय अधिकाऱ्यासाठी भूषणावह नाही. यामुळे केवळ संबंधित अधिकाऱ्याचीच नाही तर संपूर्ण अधिकारीवर्गाची प्रतिष्ठा कमी होते. सरकारी सेवेत असताना, प्रत्येक अधिकाऱ्याने काही मर्यादा पाळणे आवश्यक आहे आणि असे वर्तन शासकीय शिस्तीच्या विरुद्ध आहे, अशी चर्चा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर सुरू आहे.
(नक्की वाचा- 'अरे पिसाळलेल्या XX', 'वंचित' कडून जितेंद्र आव्हाडांना आर्वाच्च भाषेत शिवीगाळ का? वाचा Inside Story)
नागपूरच्या घटनेची आठवण
या घटनेमुळे काही दिवसांपूर्वी नागपूरमध्ये घडलेल्या एका घटनेची आठवण झाली, जिथे एका वरिष्ठ अधिकाऱ्याचा बारमध्ये बसून सरकारी फायलींवर सह्या करतानाचा व्हिडीओ समोर आला होता. अशा वारंवार होणाऱ्या घटना सरकारी अधिकाऱ्यांच्या वर्तनावर आणि त्यांच्या कार्यशैलीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करत आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world