राज्याच्या राजकारणात अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचे मनोमिलन होईल, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र, शरद पवार यांनी आज बारामतीत पत्रकारांशी बोलताना केलेल्या तीन विधानांमुळे विलीनीकरणाची शक्यता तूर्त मावळल्याचे दिसत आहे.
सुनेत्रा पवार यांच्या उपमुख्यमंत्रिपदाच्या निर्णयाबाबतही त्यांना माहिती नसल्याचं देखील त्यांना सांगितलं. म्हणजेच उपमुख्यमंत्रिपदाबाबत सुनेत्रा पवार यांना कुटुंबात कुठलीही चर्चा केली नसल्याचं यातून दिसून येत आहे. म्हणजे पवार कुटुंबात सगळं आलबेल नाही, असा मेसेज देखील बाहेर जात आहे.
शरद पवारांची 3 महत्त्वाची विधाने
"शपथविधीबाबत मला कोणतीही माहिती नाही"
सुनेत्रा पवार आज उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार असल्याच्या चर्चांवर शरद पवार यांनी म्हटलं की, "मला या शपथविधीबाबत काहीही माहिती नाही. मी सध्या बारामतीत आहे, मग मी सोहळ्याला कसा जाणार? तो सोहळा नक्की आहे की नाही, हे देखील मला माहीत नाही." या विधानातून सुनेत्रा पवारांचा निर्णय अजित पवार गटाने परस्पर घेतल्याचे स्पष्ट होत आहे.
(नक्की वाचा- Ajit Pawar News: मंचावर आले, दोनच वाक्य बोलले; अजितदादांना श्रद्धांजली वाहताना महेश लांडगे भावुक)
"विलीनीकरणाच्या चर्चेत आता खंड पडला"
विलीनीकरणावर भाष्य करताना पवार म्हणाले की, "चार महिन्यांपूर्वी राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर चर्चा सुरू होती. अजित पवार, जयंत पाटील आणि शशिकांत शिंदे यांच्यात संवाद सुरू होता आणि ते एका प्रक्रियेपर्यंत पोहोचले होते. मात्र, आता हा आघात (निधन) झाला आणि त्या प्रक्रियेत खंड पडला आहे."
"प्रफुल पटेल आणि तटकरे यांचा तो अधिकार"
सुनेत्रा पवार यांच्या उपमुख्यमंत्रिपदाबाबतच्या निर्णयांवर पवार म्हणाले, "प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे हे पक्षाचे मोठे नेते आहेत. त्यांनी काय करावे हा त्यांचा अधिकार आहे आणि त्यांनी ते ठरवलेले दिसते. त्यावर आम्ही भाष्य करणार नाही."
(नक्की वाचा- "NCP च्या एकत्रिकरणाची इच्छा नाही, तसं अजितदादाही काही बोलले नाहीत", राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचं वक्तव्य)
विलीनीकरणाची शक्यता का मावळली?
सुनेत्रा पवारांच्या नियुक्तीबाबत शरद पवारांना विश्वासात न घेतल्याने दोन्ही गटांतील दरी पुन्हा अधोरेखित झाली आहे. विलीनीकरणासाठी सुरू असलेली प्राथमिक चर्चा अजित पवारांच्या निधनानंतर थांबली असून, आता दोन्ही गट स्वतंत्रपणे आपली रणनीती आखत असल्याचे दिसत आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुकांची जबाबदारी अजित पवारांवर होती, त्यांच्या पश्चात आता ही जबाबदारी कोणाकडे जाणार, यावरही प्रश्नचिन्ह आहे.