Sharad Pawar on Dharavi Issue :विधानसभा निवडणुकीत धारावी झोपडपट्टीचं पुनर्वसन हा राजकीय मुद्दा करण्याचा प्रयत्न शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेस पक्षानं केला आहे. राहुल गांधी यांनी सोमवारी (18 नोव्हेंबर) रोजी झालेल्या पत्रकार परिषदेत या विषयावर मोदी सरकारवर लक्ष केलं होतं. राहुल गांधींच्या टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तात्काळ उत्तर दिलं होतं. आता त्यापाठोपाठ महाविकास आघाडीतील सर्वात ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी धारावी प्रकरणाचं सत्य सांगितलं आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय म्हणाले शरद पवार?
शरद पवार यांनी एका मुलाखतीमध्ये धारावी पुनर्विकासाबाबत प्रतिक्रिया दिली आहे. 'धारावीचा काही प्रश्नच नाही. ते सर्व जण अदाणींवर टीका करत आहेत. ही बैठक झाली तेव्हा अदाणी यांना धारावीमध्ये कोणताही रस नव्हता. खरतंर धारावीचा प्रोजेक्ट दुसऱ्या लोकांना देण्यात आला होता. ते इथं आले होते. या विषयावर काही चर्चा आणि वाटाघाटी सुरु होत्या, पण त्या अदाणींसोबत नाही, असं पवारांनी या मुलाखतीमध्ये स्पष्ट केलंय.
भाजपाचे आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी हा व्हिडिओ ट्विट केला आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वीच महाविकास आघाडी पक्षातील ज्येष्ठ नेत्यानं आघाडीतील नेत्यांची पोलखोल केली आहे, अशी टीका मालवीय यांनी केली आहे.
मुख्यमंत्र्यांनीही दिलं होतं उत्तर
यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही राहुल गांधी यांच्या आरोपांना उत्तर दिलं होतं. धारावीमध्ये 2 लाख जणांना घरं मिळणार आहेत. 2 लाख लोकांचं आयुष्य बदलणार आहे. ते कचऱ्यात, घाणीत राहातात. त्यांचं आयुष्य अतिशय हालाखीत आहे. तिथं दलित, आदिवासी, मागसवर्गीय सर्वांचा समावेश आहे. त्यांना न्याय द्यायचा असेल तर राहुल गांधींनी संपूर्ण माहिती घ्यावी. यापूर्वी काय झालं होतं, ते समजून घ्यावं, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं. सरकारमधून पायउतार झाल्यानंतरच विरोध का करता? असा प्रश्न मुख्यमंत्री शिंदे यांनी विचारला होता.