Sharad Pawar Health Update: राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना पुण्याच्या रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांना अस्वस्थ वाटत होते, त्यानंतर त्यांना डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार रुग्णालयात हलवण्यात आले. सध्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाकडून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
सुप्रिया सुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
खासदार सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर पोस्ट करत शरद पवार यांच्या प्रकृतीबाबत माहिती दिली. सुप्रिया सुळे यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं की, "बाबांना छातीत संसर्ग झाला आहे आणि त्यांना 5 दिवसांच्या अँटीबायोटिक्सचा कोर्स करावा लागेल. सुदैवाने, त्यांचे इतर सर्व शारीरिक रिपोर्ट्स सामान्य आहेत, त्यामुळे काळजी करण्याचे कारण नाही. तुमच्या शुभेच्छा आणि पाठिंब्याबद्दल सर्वांचे आभार. सर्व डॉक्टरांचे मनापासून आभार."
(नक्की वाचा- Big News: CM फडणवीस तातडीने दिल्ली दौऱ्यावर; NCP च्या विलिनीकरणावर मोठा निर्णय होणार?)
सुनेत्रा पवार यांनीही केली विचारपूस
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी देखील तातडीने रुबी हॉल रुग्णालयात जाऊत शरद पवार यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. "शरद पवारांची प्रकृती सध्या नियंत्रणात असून उपचार योग्य दिशेने सुरू आहेत," असे त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.
रोहित पवारांची कार्यकर्त्यांना विनंती
शरद पवार यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती कळताच राज्यातील कार्यकर्ते पुण्याच्या दिशेने येत आहेत. त्यामुळे रोहित पवार यांनी कार्यकर्त्यांना न येण्याची विनंती केली आहे. शरद पवारांची प्रकृती स्थित असून कोणीही रुग्णालयात येऊ नका असं रोहित पवारांकडून सांगण्यात आलं.