विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठं खिंडार पडलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे सिंदखेड राजा मतदारसंघातील आमदार राजेंद्र शिंगणे पुन्हा शरद पवार गटात परतले आहेत. आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यालयात त्यांचा पक्षप्रवेश पार पडला. राजेंद्र शिंगणे यांच्या पक्षप्रवेशाने अजित पवार गटाला विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मोठा धक्का बसला आहे.
"मी 1992-93 पासून शरद पवारांसोबत काम करत आहे. शरद पवारांमुळे मला राजकारणात, समाजकारणात मोठं होण्याची संधी मिळाली. अजित पवारांसोबत मी मधल्या काळात होतो, त्याचं कारणही मी वेळोवेळी सांगितलं आहे. जिल्हा बँकेच्या अनेक अडचणींमुळे बँक वाचवणे कठीण बनलं असतं. त्यामुळे बँक वाचवण्यासाठी मी अजित पवारांसोबत राहिलो. परंतु महाराष्ट्राची आज जी परिस्थिती आहे, महाराष्ट्र वाचवण्याची आज गरज आहे. शरद पवारचं हे काम करु शकतात, यावर मला विश्वास आहे", असं राजेंद्र शिंगणे यांनी म्हटलं.
(नक्की वाचा- "...तर निवडणूक आयोगावर मोर्चा काढू", महाविकास आघाडीचा भाजपवर गंभीर आरोप )
गायत्री शिंगणे यांचा बंजखोरीचा इशारा
राजेंद्र शिंगणे यांच्या पुतणी गायत्री शिंगणे यांनी नुकतीत शरद पवार यांची भेट घेतली होती. या भेटीत त्यांना राजेंद्र शिंगणे यांना उमेदवारी देऊ नये अशी मागणी केली होती. यासोबतच राजेंद्र शिंगणे यांना उमेदवारी दिल्यास बंड करण्याची घोषणा देखील त्यांनी केली होती. त्यामुळे राजेश शिंगणे यांच्या पक्षप्रवेशानंतर शरद पवार गटातही नाराजीनाट्य घडू शकतं.
(नक्की वाचा- सांगलीत ओढ्यात आला नोटांचा पूर! 500 रुपयांच्या नोटा गोळा करण्यासाठी नागरिकांची गर्दी)
अजित पवार गटाची टीका
राजेंद्र शिंगणे यांच्या पक्षांतराच्या भूमिकेनंतर अजित पवार गटाचे आमदार मिटकरी यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. ज्यांना तिकीट मिळणार ते अजितदादांसोबत आहेत. ज्यांना अजित पवारांनी तिकीट नाकारलंय ते इकडे तिकडे हुडकायचं काम करत आहे. स्वतः राजेंद्र शिंगणे यांची पुतणी गायत्री शिंगणे यांनी म्हटलं की आम्ही निष्ठावंत म्हणून सोबत राहिलो असताना यांना प्रवेश देऊन तिकीट द्यायचं ठरवलंय, असं अमोल मिटकरी यांनी म्हटलं.