मुख्यमंत्र्यांच्या ठाणे जिल्ह्यात शिवसेना-भाजपामध्ये तणाव, बॅनर लावून आमदाराला डिवचलं

BJP vs Shiv Sena मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या ठाणे जिल्ह्यात शिवसेना-भाजपातील तणाव  समोर आला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
उल्हासनगर:

निनाद करमरकर, प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकाही एकत्र लढणार असल्याचं महायुतीनं जाहीर केलंय. महायुतीमध्ये भारतीय जनता पार्टी, शिवसेना (एकनाथ शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) हे तीन प्रमुख पक्ष आहेत. या पक्षांमध्ये सध्या जागावाटप सुरु आहे. महायुतीमध्ये कोणतेही मतभेद नसल्याचं राज्य पातळीरील नेते वारंवार सांगत आहेत. त्याचवेळी स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांची नाराजी वारंवार उघड होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या ठाणे जिल्ह्यात शिवसेना-भाजपातील तणाव समोर आला आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

उल्हासनगरातील शहाड ब्रिजला भगदाड पडल्याने आणि शहरातील रस्त्यांवर खड्ड्यांच्या समस्येमुळे उल्हासनगरच्या शिवसेना विरुद्ध भाजप युतीत पुन्हा तणाव निर्माण झाला आहे. शिवसेना शिंदे गटाचे युवासेना कल्याण लोकसभा सचिव विक्की भुल्लर यांनी भाजप आमदार कुमार आयलानी यांच्यावर टीका करत शहरात बॅनर लावले आहेत. या बॅनर्सद्वारे त्यांनी आमदारांच्या कामगिरीवर अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.

आपण युतीच्या विरोधात नाही, पण शहराच्या विकासासाठी हा बॅनर लावल्याचं भुल्लर यांनी स्पष्ट केलं आहे. उल्हासनगरची जागा सध्या भाजपाकडं आहे. जागावाटपामध्ये ही जागा शिवसेनेला मिळाल्यास भुल्लर निवडणूक लढवण्यासाठी इच्छूक आहेत. उल्हासनगर शहरातील विकासकामे आणि रस्त्यांची देखभाल यावरून स्थानिक राजकारण तापले आहे.

( नक्की वाचा : राज ठाकरेंचा आजपासून महाराष्ट्र दौरा, पहिल्या टप्प्यात 'या' भागावर फोकस )

शहाड ब्रिजवरील भगदाडामुळे आणि शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे नागरिकांमध्ये नाराजी आहे. विक्की भुल्लर यांच्या बॅनर्समुळे उल्हासनगर शहरात राजकीय वातावरण तापले आहे. शहरातील नागरिकांनी देखील या समस्यांकडे लक्ष देण्याची मागणी केली आहे. भाजप आमदार कुमार आयलानी यावर काय प्रतिक्रिया देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Advertisement
Topics mentioned in this article