मालवणच्या समुद्रकिनाऱ्यावरील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याने राज्यभरातून संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेनंतर राज्य सरकारकडून सारवासारव करण्याचा प्रयत्न केला जात आहे. याच राजकोटच्या किल्ल्यासमोरील सिंधुदुर्ग किल्ला गेल्या 300 ते 350 वर्षांपासून ताठ मानेनं उभा आहे. मात्र आठ महिन्यांपूर्वी केलेला पुतळा का कोसळला, पुतळा इतक्या घाईघाईने का तयार केला, परवानगी होती का, योग्य ती काळजी घेण्यात आली नव्हती का.. NDTV मराठीने या भागात जाऊन अशा सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
45 किमी प्रतितास वेगाने वारा वाहत असल्याने शिवरायांचा पुतळा कोसळला असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून केला जात आहे. मात्र खरंच इथे त्या दिवशी इतका वारा वाहत होता? समुद्रकिनारी नेहमीच सोसाट्याचा वारा असतो. त्या दिवशी नेमकं काय घडलं हे या झिरो ग्राऊंड रिपोर्टवरून स्पष्ट होत आहे.
नक्की वाचा - शिवरायांच्या पुतळ्याचा शिल्पकार आपटेंनी तेव्हाच व्यक्त केली होती भीती, पण तरीही दुर्लक्ष?
राजकोटच्या किल्ल्यासमोर राहणाऱ्या एका रहिवाशाने सांगितलं की, त्या दिवशी मालवणच्या समुद्रकिनाऱ्याजवळ सोसाट्याचा वारा वाहत होता. मात्र पावसाळ्यात नेहमी अशीच परिस्थिती असते. समुद्र जवळ असल्याने या परिसरात जोरदार वारा वाहतो. त्या दिवशी दुपारी साडेबाराच्या दरम्यान वारा वाहायला सुरुवात झाली. पुतळा कोसळल्यानंतर मोठा आवाज आला. आम्हाला वाटलं घरावरचे पत्रे उडाले. मात्र काही वेळाने धक्कादायक चित्र दिसलं. या किल्ल्याच्या समोर वस्ती आहे. येथे राहणारे महेश कामत यांनी सांगितलं की, पुतळा कोसळल्यानंतरचं दृश्य मी विसरू शकत नाही. हे खूप दुर्देवी आहे'. यापुढे पुतळा उभा करताना स्थानिकांची मदत घ्यावी. येथील नागरिकांना कोकणातील हवामानाची माहिती असते. आम्हाला तंत्रज्ञानाच्या फार गोष्टी माहिती नसल्या तरी काही बाबतीत आमची मदत होऊ शकते, अशी भावना कामतांनी व्यक्त केली.
घटनेच्या पाच दिवसांपूर्वी या परिसरात राहणाऱ्या फर्नांडिस महाराजांच्या दर्शनाला गेल्या होत्या. त्यांनी सांगितल्यानुसार, पुतळा गंजलेला होता. बाहेरूनही ते स्पष्ट दिसत होतं. याशिवाय लाद्या उखडल्या होत्या. बांधकाम विभागाचे लोक काही दिवसांपूर्वी येऊन गेल्याचंही त्यांनी सांगितलं. गंजलेला पुतळा दिसला की नाही? हा प्रश्न मात्र अनुत्तरित आहे.
काही स्थानिकांनुसार त्यावेळी 45 किलोमीटर प्रतितास वेगाने वारा वाहत नव्हता. पुतळा कोसळण्या इतका वारा वाहत नाही. आतापर्यंत इतके पुतळे तयार झाले, पण ते कोसळले का? असा सवाल काही मालवणकरांनी उपस्थित केला. वाराच दोषी असता तर सिंधुदुर्ग किल्ला इतकी वर्षे कसा राहिला असता, असा सराव स्थानिकांकडून उपस्थित करण्यात आला. पहिल्या पंधरा दिवसात चौथऱ्यावरील लाद्या उखडल्याचं स्थानिक सांगतात. त्यावरुन बांधकामात दुर्लक्ष केल्याचा आरोप केला जात आहे.