विशाल पाटील, मुंबई
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गंगा नदीच्या प्रदूषणाचा प्रशान गुढीपाडवा मेळाव्यातून पुन्हा उपस्थित केला होता. मात्र आता यावरून राजकारण होताना पाहायला मिळत आहे. "गंगाजल शुद्धच आहे पण काहींच्या विचारांचे काय?" असा सवाल करत शिवसेनेकडून राज ठाकरेंना डिवचण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. शिवसेना शिंदे गटाचे माजी नगरसेवक समाधान सरवणकर यांनी हे बॅनर लावले आहेत.
बॅनरवर काय?
"144 वर्षांनी आलेल्या दिव्य महाकुंभाचा ऐतिहासिक सोहळा! जगभरातील 60 कोटींहून अधिक हिंदू बांधवांनी त्रिवेणी संगमात पवित्र स्नान करून अखंड हिंदू एकात्मतेचा जागतिक संदेश दिला! हे केवळ श्रद्धेचे नव्हे, तर हिंदू संस्कृतीच्या गौरवशाली भव्यतेचे जिवंत प्रतीक आहे."
"हा क्षण अभिमानाचा, हा क्षण गौरवाचा, हा क्षण हिंद एकजुटीचा. हर हर गंगे! नमामी गंगे! गंगाजल शुद्धच आहे पण काहींच्या विचारांचे काय?" असा खोचक सवाल शिवसेनेच्या या बॅनरमधून विचारण्यात आला आहे.
काय म्हणाले होते राज ठाकरे?
गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी म्हटलं होतं की, "आपण नद्यांना माता आणि देवी म्हणतो, पण आपल्या देशातील नद्यांची स्थिती खूपच चिंताजनक आहे. गंगा नदी स्वच्छ करण्याची मोहीम सुरू करणारे पहिले व्यक्ती राजीव गांधी होते. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील म्हणाले की ते गंगा स्वच्छ करतील. परंतु अनेक लोकांनी मला सांगितले की महाकुंभमध्ये गंगेत स्नान केल्यानंतर ते आजारी पडले. प्रश्न गंगेच्या अपमानाचा किंवा कुंभमेळ्याच्या अपमानाचा नाही, प्रश्न गंगेच्या स्वच्छतेचा आहे."
"गंगा स्वच्छतेवर आतापर्यंत ३३ हजार कोटी रुपये खर्च झाले आहेत. अर्धवट जळालेले मृतदेह गंगेत टाकले जात आहेत. जर धर्म आपल्या नैसर्गिक साधनसंपत्तीच्या रक्षणात अडथळा आणत असेल तर त्या धर्माचा काय उपयोग?" असा सवास राज ठाकरे यांनी उपस्थित केला होता.