रायगडच्या पालकमंत्रिपदावरून उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. काही गोष्टी नजर चुकीने झाल्या असतील असं उदय सामंत यांनी म्हटलं आहे. उदय सामंत यांच्या वक्तव्यानंतर पालकमंत्री पदावरुन शिवसेनेत नाराजीचा सूर असल्याचं अधोरेखित झालं आहे.
राज्यातील पालकमंत्र्यांची यादी शनिवारी रात्री जाहीर झाली आहे. या यादीनंतर शिवसेनेत नाराजी असल्याचं समोर आलं आहे. रायगडच्या पालकमंत्रिपदावर शिवसेनेच्या भरत गोगावले यांनीही दावा केला होता. मात्र अदिती तटकरे यांनी बाजी मारत पालकमंत्री पदरात पाडून घेतलं आहे.
(नक्की वाचा- Guardian Minister: पालकमंत्र्यांना काय अधिकार असतात? इतकं महत्त्वाचं का असतं हे पद?)
यावर बोलताना उदय सामंत यांनी म्हटलं की, "अनेकांच म्हणणं होतं की भरत गोगावले यांना रायगडचं पालकमंत्रिपद द्यावं. सहा आमदारांचं म्हणणं होतं की गोगावले यांना पालकमंत्री पद द्यावं. भरत गोगावले यांना पालकमंत्रिपद मिळावं यासाठी अनेकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेही मागणी केली होती."
नक्की वाचा - मुंडेंना धक्का, तटकरेंना बळ... पालकमंत्र्यांच्या यादीतून मुख्यमंत्र्यांनी काय दिले महत्त्वाचे संदेश?
"काल यादी जाहीर झाल्यानंतर मला देखील धक्का बसला. याविषयी मुख्यमंत्र्यांशी बोलणं झालेलं नाही, कारण दावोस दौऱ्यावर गेले आहेत. काही गोष्टी नजरचुकीने झाल्या असतील. भरत गोगावले आणि दादा भुसे यांना पालकमंत्रिपद मिळावं असं मला देखील वाटत होतं. लवकरच मुख्यमंत्र्यांनी, उपमुख्यमंत्री यांच्यासोबत चर्चा करू. याविषयी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री निर्णय घेतील", असंही उदय सामंत यांनी म्हटलं.