मुंबई-गोवा महामार्गाच्या दुरवस्थेवरुन शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाणांवर टोकाची टीका केली. यावेळी रविंद्र चव्हाण यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. मात्र रामदास कदम यांच्या थेट टीकेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आमदार प्रविण दरेकर आणि रविंद्र चव्हाण यांनी देखील प्रत्युत्तर देत युतीधर्माची आठवण करुन दिली. महायुतीत मतभेद निर्माण होत असल्याने रामदास कदम यांनी आम्हाला देखील युती टिकवायची आहे, असं म्हटलं. मात्र रविंद्र चव्हाण यांच्यावर त्यांनी पुन्हा एकदा निशाणा साधला.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
रामदास कदम यांनी म्हटलं की, रविंद्र चव्हाण महायुतीत असूनही खडा टाकण्याचा प्रयत्न करत आहेत. याबाबत मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह, सरसंघचालक मोहन भागवत यांना देखील पत्र लिहिलं आहे. रविंद्र चव्हाण यांची ताबडतोब मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी देखील मी केली आहे. भाजप नेते माझं पत्र गेल्यानंतर आता ऐकतात की नाही बघू, असंही कदम यावेळी म्हणाले.
रविंद्र चव्हाण शिवसेना आमदाराच्या बाजूने उभं न राहता, राष्ट्रवादीच्या नेत्याला मदत करतात. माझा मुलगा आमदार योगेश कदम यांना पाडण्याचा प्रयत्न रविंद्र चव्हाण करत असतील आणि विरोधकांना ताकद देण्याचा प्रयत्न करत असतील, तर आम्ही काय गप्प बसायचं. त्यामुळेच मी वरिष्ठांना पत्र लिहिले आहे. एकनाथ शिंदे यांच्याशी आम्ही बोलू. अन्यथा आम्ही बाजूला होऊ, असा इशारा देखील रामदास कदम यांनी दिला.
(नक्की वाचा- हे कुठल्या युतीधर्मात बसतं? रामदास कदमांच्या वक्तव्यावर फडणवीसांचा संताप )
देवेंद्र फडणवीसांनीही प्रत्युत्तर
देवेंद्र फडणवीसांच्या युतीधर्माचं पालन करण्याच्या सल्ल्यावर बोलताना रामदास कदम यांनी म्हटलं की, मी युतीधर्म पाळतोय म्हणून वरिष्ठांना पत्र लिहिलं आहे. एकनाथ शिंदे यांना देखील मी याबाबत कळवलं आहे. महायुतीत असे मंत्री असतील आणि यांचा बंदोबस्त झाला नाही तर भविष्यात अडचण निर्माण होऊ शकते. आम्ही विश्वासाने तुमच्यासोबत आलो आहोत. आमच्या आमदारांच्या मुळावर तुम्ही उठत असाल तर आम्ही काय केलं पाहिजे हे देवेंद्र फडणवीसांनी सांगावं. ते जे सांगितील ते आम्हाला मान्य असेल, असंही कदम यांनी म्हटलं.
एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीसांमध्ये चर्चा
माझ्या माहितीनुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं देवेंद्र फडणवीसांशी बोलणं झालं आहे. याबाबत मी समोरच्यांना ताकीद देतो, असं देखील देवेंद्र फडणवीस म्हणाले. मात्र कालचा विषय मुंबई-गोवा मार्गाचा होता. राजकारण गेलं खड्ड्यात आम्ही हे किती वर्ष सहन करायचं. याबाबत लवकरच शासन निर्णय केला पाहिजे, अशी मागणी देखील रामदास कदम यांनी केली.
(नक्की वाचा - लोकसभेतील चुका दुरुस्त करण्याचा प्रयत्न? मुंबईतील जनसन्मान यात्रा अजित पवारांसाठी 3 कारणांमुळे महत्त्वाची)
मुंबई-गोवा महामार्गाचं काम 14 वर्षांपासून सुरु आहे. कोकणात माणसे राहत नाहीत का? कोकणावर अन्यात होत असेल तर कोकणवासियांनी किती सहन करायचं. कोकणवासियांनी मला विचारलं आता गणपतीला कोकणात जायचं कसं? लाखो नागरिक गणोशोत्सवाला कोकणात जात असतात. गेल्यावर्षी रविंद्र चव्हाण यांनी महामार्ग पूर्ण करण्याचं आश्वासन दिलं होतं, ते पूर्ण झालं नाही. समृद्धी महामार्ग विक्रमी वेळेत पूर्ण झाला. मग मुंबई गोवा मार्ग का पूर्ण होत नाही. पाच वर्ष रविंद्र चव्हाण मुंबई-गोवा महामार्ग पूर्ण करु शकत नसतील तर अशा नालायक मंत्र्याची हकालपट्टी भाजपचे वरिष्ठ नेते का करत नाहीत. ते पत्रकारांना घेऊन पिकनिक करतात, चमकोगिरी करतात, अशी टीका देखील रामदास कदम यांनी केली.