Dombivli News: डोंबिवली पश्चिमेतील तुळशीराम बंगल्याजवळ सोमवारी सकाळी एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना उघडकीस आली आहे. स्वतःच्या पोटच्या तीन लहान मुलांना भररस्त्यात सोडून एक आई बेपत्ता झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी तुळशीराम बंगल्याजवळ तीन लहान मुले रडत आणि घाबरलेल्या अवस्थेत नागरिकांना मिळून आली. यामध्ये एक मुलगा आणि दोन मुलींचा समावेश असून, त्यांचे वय साधारणतः 4 ते 5 वर्षांच्या दरम्यान आहे. नागरिकांनी जेव्हा मुलांकडे विचारपूस केली, तेव्हा "आई खाऊ आणायला जाते असे सांगून गेली आहे," असे उत्तर मुलांनी दिले. मात्र, बराच वेळ उलटूनही आई परतली नाही.
(नक्की वाचा- DMart VIDEO: डीमार्टमध्ये जात असाल तर सतर्क राहा! एक चूक महागात पडेल)
शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्याची तत्परता
मुलांची कासावीस अवस्था पाहून एका स्थानिक महिलेने शिवसेनेच्या महिला पदाधिकारी जयश्री यादव यांना पाचारण केले. घटनेचे गांभीर्य ओळखून जयश्री यादव यांनी तिन्ही मुलांना तात्काळ आपल्या ताब्यात घेतले आणि त्यांना सुरक्षितपणे विष्णू नगर पोलीस ठाण्यात नेले.
पोलीस तपास सुरू
विष्णू नगर पोलिसांनी या घटनेची नोंद घेतली असून मुलांच्या आईचा शोध युद्धपातळीवर सुरू केला आहे. पोलीस परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत असून त्या महिलेने मुलांना कोठे सोडले आणि ती कोणत्या दिशेला गेली, याचा माग काढला जात आहे. आईने मुलांना अशा प्रकारे का सोडले, याचे कारण अद्याप अस्पष्ट असून पोलीस सर्व बाजूंनी तपास करत आहेत.
(नक्की वाचा- IPL 2026: रोहित, रिकल्टन, पुरनने सामना गाजवला; चर्चा रघु शर्माच्या चिठ्ठीची, मजकूर वाचून सगळेच भावुक)
शिवसेना पदाधिकारी किरण मोनकर यांनी या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. भररस्त्यात अशा प्रकारे लहान मुलांना सोडून जाण्याच्या घटनेमुळे शहरात सुरक्षेचा आणि सामाजिक संवेदनशीलतेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world