राजकारणी आणि गुंड असं समीकरणच आहे की काय अशी शंका उपस्थित होई लागली आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी ठाण्यातील बड्या नेत्याचा स्वप्निल शेडगे नावाच्या गुंडावर वरदहस्त असल्याचा आरोप केला आहे. एका तरुणावर शस्त्राने हल्ला चढवला असताना देखील ठाण्यातील हा शिंदे गटाचा नेता या आरोपीला पाठिशी घालत असल्याचं सुषमा अंधारे यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये लिहिलं आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
सुषमा अंधारे यांची फेसबूक पोस्ट
सुषमा अंधारे यांनी फेसबूक पोस्टमध्ये लिहिलं की, शिवसेनेच्या ठाणे येथील युवासेनेचा पदाधिकारी स्वप्निल शेडगे याने 30/35 मुले घेऊन तुषार उर्फ जयेश जाधव व त्याचा भाऊ विशाल जाधव आणि अविनाश जाधव यांच्यावर तलवारीने बरेच वार केले. त्यात जयेश जाधव याला गंभीर जखमी करुण 50 टाके पडले. फिर्यादी हा सिव्हील हॅास्पिटलमध्ये दाखल होता, त्यावेळी स्वप्निल शेडगे याने पोलिसाच्या उपस्थितीत सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जाऊन फिर्यादीला धमकावले.
माझ्याकडे 100 मुले आहेत, त्यांना प्रत्येकी 1-1 लाख रुपये देऊन 13 मे च्या आधी तुम्हाला संपवणार, असल्याची धमकी दिली. त्याचे सीसीटीव्ही चित्रीकरण उपलब्ध आहे. वर्तकनगर पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद क्र. 180/2025 ची फिर्याद कलम 307 अन्वये दाखल झाल्यानंतरही वरीष्ठ पोलिस निरीक्षक वाकचौरै यांना झालेल्या लक्ष्मी प्रसादाने व पोलिसांच्या वरदहस्ताने आरोपी मोकाट फिरत होता.
(नक्की वाचा- बीडमधील पाचवा संतापजनक Video; आता तर क्रौर्याची हद्दच गाठली!)
आरोपी पोलिस अधिकारी चिंतामणी व वरीष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या संपर्कात होता. तरी देखील अटक होत नव्हती. गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट क्र. 5 ने आरोपीला व्हिवियाना मॅाल येथे अटक केल्यानंतर पोलिस स्थानकात त्याची प्रचंड बडदास्त ठेवण्यात आली. मंत्रीपुत्राने घरून जेवणाचे डबे पुरवले अशी माहिती मिळते. हे कमी होते म्हणून की काय आरोपी लॅाकअपमधून आरटीओ अधिकाऱ्यांना फोन करून पैशाची मागणी करीत होता.
(नक्की वाचा - Maharashtra BJP : विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपाची यादी ठरली! अनुभवी नेत्याला पहिल्यांदाच संधी?)
आरोपीची कारागृहात रवानगी होताच मंत्री महोदयांच्या आशीर्वादाने आरोपीला सिव्हिल रूग्णालयात दाखल करण्यात आले. स्वतः मंत्री महोदयांचे स्वीय सहाय्यक त्यांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी आले होते. सिव्हील रूग्णालयात आरोपीची बडदास्त ठेवण्यात आलेली आहे. त्या बदल्यात मोठ्या प्रमाणात लक्ष्मी दर्शन झालेले असावे. ज्या ठिकाणी आरोपीला ठेवण्यात आले आहे, त्या विभागाचे सीसीटीव्ही बंद करण्यात आलेले असून आरोपी बिनधास्त वावरत आहे.
"आरोपीला भेटण्यासाठी गुंडांच्या रांगा लागल्या आहेत. आरोपी बिनधास्त फोनवर बोलत आहे. मी सगळ्यांना पैसे दिले आहेत. कुणी माझे काही बिघडू शकत नाही. अशा वल्गना करत आहे. ठाण्यात जणू कायदा आणि सुव्यवस्थाच शिल्ल्क राहिलेली नाही. या गुंड स्वप्निल शेडगेचा आका नेमका कोण आहे", असा सवाल सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला आहे.