पुण्यातील सिंहगड रस्त्यावरील वाहतुकीची कोंडी सुटणार, अजित पवारांकडून पहिल्या टप्प्याचं उद्घाटन

पुण्यातील सिंहगड रस्त्यावरील वाहतुकीची कोंडी सोडविण्याच्या दृष्टीने हा उड्डाणपूल उभारण्यात आला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
पुणे:

पुण्यात आज सिंहगड रोडवरच्या उड्डाणपुलाचा उद्घाटन सोहळा अजित पवारांच्या हस्ते पार पडला. आजपासून हा नवा उड्डाणपूल प्रवासासाठी खुला झाला आहे. पुण्यातील सिंहगड रस्त्यावरील वाहतुकीची कोंडी सोडविण्याच्या दृष्टीने हा उड्डाणपूल उभारण्यात आला आहे. या पुलाच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन करण्यात आलं आहे. राजाराम पुल ते फनटाईम सिनेमा थिएटरपर्यंत सुमारे 2.6 किलोमीटर लांबीचा हा उड्डाणपूल कामासाठी एकूण 118.37 कोटी इतका खर्च अपेक्षित आहे. त्यातील पहिला टप्पा पूर्ण होऊन दुसऱ्या टप्प्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. मार्च 2025 पर्यंत होणार उड्डाणपूल पूर्ण होणार असल्याचं सांगितलं जात आहे. 

अजित पवारांच्या हस्ते या उड्डाण पुलाचं उद्घाटन करण्यात आलं असून यावेळी अजित पवारांनी आनंद व्यक्त केला. दुसरीकडे आज चांदणी चौकातला पुल तयार झाला, पण त्यावरून जे मार्ग गेले किंवा रस्ते गेले त्यावरून पुणेरी टोमणे असलेल्या पाट्या पाहायला मिळतात, असंही अजित पवार म्हणालेत. यावेळी अजित पवारांनी सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छाही दिल्या. 

नक्की वाचा - 78th Independence Day LIVE : 'आपला देश बुद्धांचा, युद्ध आपला मार्ग नाही'; लाल किल्ल्यावरून पंतप्रधान मोदींचा संदेश

अजित पवार म्हणाले...
आजचा दिवस आनंदाचा आहे, आज सिंहगड रोडवरील पुलाच उद्घाटन होत आहे ही पुणेकरांना भेट आहे. पुण्यात वाहतुकीचा प्रश्न निर्माण झाला आहे त्याला वाढणारी लोकसंख्या कारणीभूत आहे. आम्ही काम करत असताना पुणेकरांना वाहतूक कोंडीतून कशी सुटका करता येईल यासाठी प्रयत्न करीत असतो. वेगळं काय करता येईल, पुण्याच्या वाहतूक कोंडीवर आम्ही चर्चा करत असतो. सगळ्या संस्थांना एकत्र करून यावर चर्चा करून मार्ग काढायचा असतो.  

नितीन गडकरी साहेबांनी देखिल पुण्याला अनेक मोठे प्रकल्प दिलेत. आज चांदणी चौकातला पुल तयार झाला पण त्यावरून जे मार्ग गेले किंवा रस्ते गेले त्यावरून पुणेरी टोमणे असलेल्या पाट्या पाहायला मिळतात. मेट्रोचं काम सुरू आहे. शहराच्या चारी बाजूंनी मेट्रो करायची आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका झाल्या पाहिजेत, ही आमची सगळ्याची इच्छा लोकशाहीमध्ये निवडणुका झाल्या पाहिजेत. सगळ्यांना न्याय मिळाला पाहिजे. महापालिकेत नगरसेवक असले की लोकांची कामे होतात. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आम्ही आणली, याचा आनंद आहे.  17 तारखेला मोठा कार्यक्रम पुण्यात घेत आहोत. अनेक टीका झाल्या, पण काल 35 लाख माय बहिणीच्या अकाऊंटला पैसे जमा झाले. आज आणि उद्या 50 लाख महिलांना पैसे देण्याचा आमचा प्रयत्न आहे. 

Advertisement