सोमय्या शाळेच्या मुख्याध्यापिकेला इस्त्रायल आणि हमास यु्द्धावर पोस्ट करणं महागात पडलं आहे. शाळेच्या मुख्याध्यापिका परवीन शेख यांनी सोशल मीडियावरुन एक पोस्ट केली होती, यात त्यांनी हमासचं समर्थन केलं होतं. शाळेच्या व्यवस्थापकांनी त्यांना पदाचा राजीनामा देण्याचे निर्देश दिले होते. मात्र त्यांनी राजीनामा देण्यास नकार दिला होता. आता व्यवस्थापकांकडून त्यांच्याविरोधात कारवाई करीत मुख्याध्यापकपदावरुन हटवलं आहे.
परवीन शेख यांची प्रतिक्रिया...
या प्रकरणात परवीन शेख कायदेशीर पर्यायांचा विचार करीत असल्याचं सांगितलं जात होतं. त्यांनी सांगितलं की, व्यवस्थापकडून बडतर्फ करण्याची नोटीस मिळण्यापूर्वीच सोशल मीडियावर याबाबतची माहिती वाचून हैराण झाले. मी शाळेला 100 टक्के दिलं आहे. मला पदावरुन हटवणं अवैध आहे.
नक्की वाचा - कझाकिस्तानच्या माजी मंत्र्याने पत्नीची क्रूरपणे मारहाण करत केली हत्या; संतापजनक CCTV फुटेज समोर
इस्त्रायल-हमास युद्धावरुन सोशल मीडियावर पोस्ट...
परवीन शेख यांनी पॅलेस्टाइन आणि हमास-इस्त्रायल यु्द्धाबद्दल सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून आपले विचार व्यक्त केले होते. त्यांनी हमासच्या समर्थनार्थ पोस्ट केली होती. यानंतर त्यांच्यावर हमास समर्थक, हिंदु विरोधी आणि इस्लामवादी उमर खालिदाचे समर्थक असल्याचा आरोप करण्यात आला होता. याबाबत परवीन शेख यांनी सांगितलं होतं की, 26 एप्रिल रोजी शाळेच्या व्यवस्थापनासोबत झालेल्या बैठकीत त्यांना राजीनामा देण्यास सांगण्यात आलं होतं. त्यानंतर काही दिवस मी काम सुरू ठेवलं होतं. मात्र व्यवस्थापनाकडून वारंवार राजीनामा देण्यासाठी दबाव टाकला जात होता.
याबाबत शेख म्हणाल्या की, मी लोकशाही असलेल्या भारतात राहते आणि मला आपले विचार मांडण्याचं स्वातंत्र्य आहे. हाच लोकशाहीचा प्रमुख आधार आहे. माझ्या अभिव्यक्तीचा इतका भयंकर परिणाम होईल आणि माझ्याविरोधात अशा प्रकारचे एजेंडे राबवले जातील असा विचारही मी कधी केला नव्हता.