लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. त्यामुळे सर्वच शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी तयारी सुरू केली असून राज्य उत्पादन शुल्क ठाणे विभागाने कंबर कसली आहे. आचारसंहिता लागल्यापासून आतापर्यंत राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून 1 कोटी 56 लाख 72 हजार 844 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. यामध्ये 312 गुन्हे दाखल झाले आहेत. त्यापैकी 188 गुन्ह्यांची माहिती मिळाली असून 122 गुन्ह्यामध्ये अद्याप कोणतीही माहिती हाती लागलेली नाही. आतापर्यंत गोवा, पंजाब , हरियाणा येथून आलेल्या गाड्या किंवा परराज्यात जात असलेल्या गाड्यांवर कारवाई करण्यात येत असल्याची माहिती ठाणे जिल्ह्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे वरिष्ठ अधिकारी निलेश सांगडे यांनी दिली.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्काच्या ठाणे विभागाने दोन भरारी पथके आणि कार्यरत अधिकारी कर्मचाऱ्यांमधून विशेष भरारी पथकाची स्थापना करण्यात आली आहे. मतदारांना कोणत्याही प्रकारच्या मद्याचे आमिष दाखवून मतदान होऊ नये यासाठी काळजी घेतली जात आहे. संपूर्ण जिल्ह्यासाठी फक्त 100 कर्मचारी काम करत असून आत्तापर्यंत 190 आरोपींना अटक केली आहे, तर 9 वाहने जप्त करण्यात आली आहेत. विशेष म्हणजे या आरोपींमध्ये एका महिलेचाही समावेश आहे.
नक्की वाचा - राज यांना ठाकरे गटाने डिवचले, चौकातच थेट व्यंगचित्र लावले
अवैध दारू निर्मिती आणि विक्रीवर बारकाईने लक्ष असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी निलेश सांगडे यांनी दिली. रेल्वेसाठी आरपीएफ आणि जीआरपी यांच्याकडून कारवाई करण्यात येत आहे. रेल्वेमधून देखील तस्करी होऊ नये यासाठी आमची यंत्रणा सतर्क असल्याची माहिती निलेश सांगडे यांनी दिली.