शेअर बाजारात आज मोठी पडझड पाहायला मिळाली. काही तासात शेअर बाजारातील कंपन्यांची मार्केट कॅप जवळपास15 लाख कोटींनी कमी झाली. भारतातच नाहीतर जगभरातील शेअर बाजार आज आपटले. अमेरिकेत मंदीची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिकन शेअर बाजारात मोठी घसरण झाली. याचा परिणाम आशियातील शेअर बाजारांवरही झाला.
जगभरातील बाजार घसरले
डाओ फ्यूचर्समध्ये 0.75 टक्के तर नॅस्डॅक फ्यूचर्समध्ये देखील 2.5 टक्क्यांची घसरण झाली आहे. तर जपानचा निक्केई देखील 2000 अंकांनी आपटला. तर चीनचा शांघाई कंपोझिट जवळपास 0.5 टक्क्यांनी घसरला. हाँगकाँग मार्केट हँग सेंगदेखील 1 टक्क्यांनी खाली आला. कोरियाचं मार्केट कोस्पी 4.8 टक्क्यांनी घसरला.
शेअर बाजारातील पडझडीचं कारण काय?
यूएस फेडने जुलै महिन्याचं पतधोरण जाहीर केलं. यामध्ये व्याजदरात कोणतीही कपात केलेली नाही. व्याजदरात कपात न केल्याने बाजारात असा मेसेज गेला की अमेरिका मंदीच्या कचाट्यात साडलला आहे. यूएस फेडला व्याजदरात कपात करणे अपेक्षित होते. अनेक तज्ज्ञांचं मत आहे की, बाजार नियंत्रणात आणायचा असेल तर किमान 0.75 टक्के व्याजदरात कपात अपेक्षित आहे.
- अमेरिकेतील सध्याचा बेरोजगारी दर अत्यंत खराब आहे. जुलै महिन्यात बेरोजगारी दर 4.3 टक्के आहे, जो मागील तीन वर्षातील सर्वाधिक आहे.
- अमेरिकेत सलग चौथ्या महिन्यात बेरोजगारी दर वाढला आहे. जून महिन्यात बेरोजगारी दर 4.1 टक्के होता. अंदाज वर्तवला जात होता की जुलै महिन्यात बेरोजगारी दर वाढणार नाही.
- नोकऱ्यांची निर्मिती देखील कमी झाली आहे. यावेळी 1.84 लाख नोकऱ्या उपलब्ध होतील अशी अपेक्षा होती. मात्र प्रत्यक्षात 1.14 लाख नोकऱ्याच उपलब्ध झाल्या.
जपानमध्ये व्याजदर वाढले
जपानमधील 0.25 टक्क्यांनी वाढलेल्या व्याजदरांनी आगीत तेल ओतण्याची काम केलं. जपानने व्याजदर वाढवण्यासाठी घाई केल्याचं तज्ज्ञांचं मत आहे. त्यामुळे निक्केई देखील जोरदार आपटला. 11 जुलै रोजी निक्केईने नवीन ऑल टाईम हाय लगावला होता. तेथून बाजार आता 20 टक्के खाली आला आहे. हेच कारण आहे की संपूर्ण आशियातील बाजारांवर याचा परिणाम झाला आहे.
अमेरिकन कंपन्यांची निकाल
अमेरिकन बाजारातील कंपन्यांच्या निराशाजनक निकालाचा देखील परिणाम झाला आहे. ई-कॉमर्स कंपनी अॅमेझॉनच्या तिमाही निकालात 8.8 टक्क्यांची घसरण नोंदवली गेली आहे. त्यानंतर इंटेल कंपनीने देखील आपल्या कर्मचाऱ्यांची कपात केली आहे. इंटेल कंपनीच्या या घोषणेनंतरही कंपनीचा शेअर आपटला. एनव्हिडीयाचे शेअर देखील गुरुवारी 6 टक्के आणि शुक्रवारी 2 टक्क्यांनी घसरले. या नकारात्मक निकालाचा परिणाम देखील बाजारावर झाला.
हमास-इस्राईलमधील तणाव
इस्लाईल आणि हमासमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आखाती देशांमध्ये तणावाचं वातावरण आहे. हमास चीफच्या हत्येनंतर हा तणाव आणखी वाढला. याचाही परिणाम बाजारावर झाला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, इराणने इस्राईलवर हल्ल्याची देखील तयारी सुरु केली आहे. दोन्ही देशांमधील वाढत्या तणावाच्या स्थितीचा परिणाम संपूर्ण जगावर होत आहे.