Gadchiroli News: गडचिरोलीला स्ट्रॉबेरीमुळे मिळाली नवी ओळख, शेतकऱ्यांच्या प्रयत्नांना मोठे यश

एकेकाळी नक्षलवादामुळे कुप्रसिद्ध असलेल्या महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यात अनोखा प्रयोग करण्यात आला आहे. नक्षलवाद्यांच्या लाल सलामकडे पाठ फिरवत इथल्या कष्टकरी शेतकऱ्यांनी लालबुंद स्ट्रॉबेरीची शेती करण्यास सुरूवात केली आहे.  

जाहिरात
Read Time: 3 mins
Gadchiroli Strawberry Farming News

सौरभ गुप्ता, प्रतिनिधी

Gadchiroli Strawberry News : एकेकाळी नक्षलवादामुळे कुप्रसिद्ध असलेल्या महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यात अनोखा प्रयोग करण्यात आला आहे. नक्षलवाद्यांच्या लाल सलामकडे पाठ फिरवत इथल्या कष्टकरी शेतकऱ्यांनी लालबुंद स्ट्रॉबेरीची शेती करण्यास सुरूवात केली आहे.  यंदा स्ट्रॉबेरीच्या पिकातून शेतकऱ्यांना बंपर उत्पन्न मिळाले आहे. गडचिरोलीतील मुलचेरा हा डोंगराळ भाग असून येथील हवामान स्ट्रॉबेरी उत्पादनासाठी पोषक मानले जाते. आतापर्यंत स्ट्रॉबेरी म्हटलं की महाबळेश्वर डोळ्यासमोर येत होतं मात्र आता त्यासोबत मुलचेराही स्ट्रॉबेरीमुळे महाराष्ट्राच्या नकाशावर आपली ठळकपणे ओळख सिद्ध करताना दिसले तर नवल वाटायला नको. 

डाव्या विचारसरणीच्या अतिरेकाच्या सावटातून हा भाग बाहेर पडत असताना, स्थानिक शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी जिल्हा कृषी विभागाने एक प्रयोग म्हणून स्ट्रॉबेरीची लागवड करण्यास प्रोत्साहन दिले. हा प्रयोग यशस्वी होताना पाहून अन्य शेतकऱ्यांनीही स्ट्रॉबेरी लागवड करण्यास सुरूवात केली. येथे पिकवल्या जाणाऱ्या स्ट्रॉबेरीची रोपे शेजारच्या राज्यातील म्हणजेच छत्तीसगडमधील राजनांदगाव इथून आणली जातात.तालुका कृषी अधिकारी विकास पाटील यांनी  एनडीटीव्हीशी बोलताना सांगितलं की, "आम्ही जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठीच्या उपाययोजनांसंदर्भात चर्चा केली जात असताना स्ट्रॉबेरीची प्रायोगिक तत्त्वावर लागवड करण्याचा विचार बोलून दाखवला होता.

Advertisement

स्ट्रॉबेरी उत्पन्नातून 1 ते 1.5 लाख रुपयांपर्यंत कमाई

यासाठी आम्ही सुरूवातीला 50 शेतकऱ्यांना ही रोपे दिली. शेतकऱ्यांनीही त्याला चांगला प्रतिसाद दिला ज्यामुळे हा प्रयोग यशस्वी झाला. 2019 मध्ये आम्हाला पहिल्यांदा ही कल्पना सुचली होती. आमच्या लक्षात आले की, इथल्या तापमानापेक्षा जास्त तापमान असूनही राजनांदगावमधील शेतकरी स्ट्रॉबेरी पिकवत आहेत. थोडं संशोधन करून आम्ही शेतकऱ्यांना स्ट्रॉबेरी लागवडीसाठी प्रोत्साहन दिले. गडचिरोलीत स्ट्रॉबेरी येऊ शकते हे आम्हाला समजले आणि आम्ही 'विंटर डाऊन' ही व्हरायटी निवडली, जी इथल्या तापमानात तग धरू शकते." पाटील पुढे म्हणाले की, "स्ट्रॉबेरी उत्पन्नातून इथले शेतकरी 1 ते 1.5 लाख रुपयांपर्यंत कमाई करत आहेत, जी इतर पिकांच्या तुलनेत खूप जास्त आहे."

नक्की वाचा >> Beed News: बीड हादरलं! 'या' राज्य मार्गावर घडली काळीज पिळवटून टाकणारी घटना, पोलिसांचाही थरकाप उडाला

या यशामुळे अन्य शेतकरीही स्ट्रॉबेरी लागवडीकडे आकर्षित झाले. गडचिरोलीत स्ट्रॉबेरीचे पीक घेण्यासाठी लाभत असलेला प्रतिसाद हा या भागात होत असलेल्या बदलाचे प्रतीक असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकरी दीपक कालिदास कर्मकार यांनी 'NDTV'ला सांगितले की, "मी गेल्या तीन वर्षांपासून स्ट्रॉबेरी लावत आहे आणि गेल्या दोन वर्षांत खूप चांगले उत्पादन मिळाले आहे. स्थानिक प्रशासनाने मदत केली आहे. मी या मोसमात आतापर्यंत 50 हजार रुपयांची स्ट्रॉबेरी विकली आहे."

कर्मकार पुढे म्हणाले, यावर्षी किमान 50 शेतकरी स्ट्रॉबेरीची लागवड करत आहेत.  पुढच्या वर्षी ही संख्या वाढलेली पाहायला मिळेल आणि त्यामुळे उत्पादनही वाढेल. या पिकामुळे शेतकऱ्यांचा चांगला नफा मिळतोय. गोळीबार,भुसुरूंगाचे स्फोट, नक्षलवाद्यांकडून होत असलेला त्रास, दहशत हे वातावरण आता बदलू लागले आहे. सामाजिक बदलासोबतच इथल्या पीकपद्धतीतही बदल झाला. हा जिल्हा हिंसाचाराच्या सावटातून बाहेर पडत असताना येथील शेतकरीही प्रयोगासाठी सरसावताना दिसतायत. आणि याची गोड फळे त्यांनाही चाखायला मिळतायत.