मोहसिन शेख, प्रतिनिधी
Chhatrapati Sambhaji Nagar Accident news : छत्रपती संभाजीनगरमध्ये एक अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे.आपल्या डोळ्यांत अधिकारी होण्याचं स्वप्न घेऊन 'सीएटी'परीक्षेसाठी निघालेल्या 18 वर्षीय तरुणीचा अपघातात मृत्यू झाला आहे.प्रतीक्षा ढगे या तरुणीचा भीषण अपघातात मृत्यू झाला.धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर उड्डाणपुलाच्या उतारावर एका ट्रकने प्रतीक्षा आणि तिचे वडील प्रवास करत असलेल्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात प्रतीक्षाचा दुर्देवी मृत्यू झाल्यानं कुटुंबीयांसह परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
250 फुटांपर्यंत फरफटत नेलं,रस्त्यावर रक्ताचा सडा
हा अपघात इतका भयानक होता की,धडक दिल्यानंतर ट्रकचालकाने ब्रेक दाबण्याऐवजी पळ काढण्याचा प्रयत्न केला.यात प्रतीक्षा ट्रकच्या चाकाखाली अडकली आणि तब्बल 250 फुटांपर्यंत फरफटत गेली.महामार्गावर प्रतीक्षाच्या रक्ताचा सडा पडला होता.या भीषण घटनेत प्रतीक्षाचा जागीच मृत्यू झाला,तर तिचे वडील गंभीर जखमी झाले आहेत.त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर येत आहे.
नक्की वाचा >> Shaktipeeth Expressway: शक्तीपीठ महामार्गाचा मार्ग बदलला, जमिनीचा भाव वाढवण्यासाठी मोठा भ्रष्टाचार
उड्डाणपुलाचा उतार की मृत्यूचा सापळा?
धुळे-सोलापूर महामार्गावरील उड्डाणपुलाचा उतार आता वाहनधारकांसाठी 'डेथ ट्रॅप'बनत चालला आहे. उतार असल्यामुळे जड वाहने आपले नियंत्रण गमावतात किंवा अतिवेगाने वाहने चालवतात.प्रतीक्षाच्या बाबतीतही हेच घडलं.भरधाव ट्रकने मागून दिलेल्या धडकेने दुचाकीचा चक्काचूर झाला.अपघातानंतर माणुसकीला काळिमा फासत ट्रकचालक घटनास्थळावरून फरार झाला.पोलिसांकडून आता या फरार चालकाचा शोध घेतला जात आहे,पण प्रतीक्षाच्या कुटुंबाचं जे नुकसान झालंय,त्याची भरपाई भरून न निघणारी आहे.
नागरिकांचा संताप, प्रशासनाचे डोळे कधी उघडणार?
या घटनेनंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.महामार्गावर वेगाची मर्यादा पाळली जाते का?अवजड वाहनांवर कोणाचं नियंत्रण आहे का?असे जळजळीत सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.एका हुशार तरुणीचं अधिकारी होण्याचं स्वप्न एका बेजबाबदार ट्रकचालकामुळे मातीमोल झालं.प्रशासनाने आता तरी जागे व्हावे आणि अशा'रक्तपिपासू'वेगावर लगाम लावावा,अन्यथा महामार्गावर निष्पापांचे बळी जाण्याचे सत्र थांबणार नाही.