राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते अजित पवार यांच्या निधनानंतर निर्माण झालेली राजकीय पोकळी भरून काढण्यासाठी त्यांच्या पत्नी आणि राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार यांची निवड निश्चित झाली आहे. आज सायंकाळी ५ वाजता राजभवन येथे त्यांचा शपथविधी पार पडणार आहे.
अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) अत्यंत वेगाने पावले उचलत त्यांच्या रिक्त जागी सुनेत्रा पवार यांची निवड निश्चित केली आहे. हा निर्णय केवळ एका रिक्त पदाची पूर्तता नसून, पक्षाचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी आणि आगामी विलीनीकरणाच्या प्रक्रियेत आपले पारडे जड ठेवण्यासाठी टाकलेले एक महत्त्वाचे राजकीय पाऊल मानले जात आहे.
विलिनीकरणाच्या चर्चांना पूर्ण विराम लागावा?
दोन्ही राष्ट्रवादी एकसंध होण्यासाठी शरद पवार गटातील नेत्यांकडून आग्रह केला जात आहे. अजित पवारांच्या निधनांनंतर एकत्रीकरण चर्चा मुद्दाम काहीजण घडवू पाहत असल्याने, या चर्चांना पूर्णविराम देण्यासाठी घाईत सुनेत्रा पवार यांची निवड करण्याच्या हालचाली झाल्याचीही चर्चा आहे.
विलीनीकरणापूर्वीचे 'शक्तिप्रदर्शन'?
दुसरीकडे अजित पवार आणि शरद पवार या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाच्या चर्चा सध्या अंतिम टप्प्यात आहेत, अशी जोरदार चर्चा आहे. फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात याबाबत अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. मात्र, त्यापूर्वीच सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्रिपद देऊन अजित पवार गटाने आपले राजकीय स्थान सुरक्षित केले आहे.
(नक्की वाचा- Ajit Pawar News: मंचावर आले, दोनच वाक्य बोलले; अजितदादांना श्रद्धांजली वाहताना महेश लांडगे भावुक)
नेतृत्वावर पकड
विलीनीकरण झाल्यास शरद पवार गटाकडून पदांवर दावा केला जाऊ शकतो. ते टाळण्यासाठी सुनेत्रा पवार यांना आधीच सत्तेत बसवून अजित पवार गटाने आपली बाजू भक्कम केली आहे. दादांच्या निधनानंतर आमदारांमध्ये फूट पडू नये, यासाठी सुनेत्रा पवार यांच्या नावाला पसंती देण्यात आली आहे.
अजित पवारांच्या निधनानंतर त्यांचे राजकीय वारसदार कोण असा प्रश्न उपस्थित होत होता. यावेळी अनेक नावे समोर येत होती. पवार कुटुंबातून तर काही पक्षातील मोठी नावे यामध्ये चर्चिले जात होती. मात्र या चर्चांना पूर्णविराम देत एक थेट मेसेज पक्षातील नेत्यांना कार्यकर्त्यांना देण्याची गरज होती. यामुळे सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री पदावर बसवण्याची घाई केली असावी, अशी शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त केली आहे.
(नक्की वाचा- "NCP च्या एकत्रिकरणाची इच्छा नाही, तसं अजितदादाही काही बोलले नाहीत", राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचं वक्तव्य)
मंत्रिमंडळात काय बदल होणार?
अजित पवार यांच्याकडे असलेले महत्त्वाचे अर्थ आणि नियोजन खाते सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतःकडे ठेवण्याची शक्यता आहे. आगामी अर्थसंकल्प देखील मुख्यमंत्री फडणवीस सादर करू शकतात. तूर्त सुनेत्रा पवार यांना कोणतेही खाते न देता केवळ उपमुख्यमंत्री म्हणून शपथ दिली जाऊ शकते. मंत्रिमंडळ विस्तारात त्यांना जबाबदारी दिली जाईल.
सुनेत्रा पवार सध्या आमदार नाहीत. त्यामुळे पुढील सहा महिन्यांत त्यांना विधीमंडळावर निवडून येणे बंधनकारक असेल. कदाचित बारामतीच्या पोटनिवडणुकीतून त्या रिंगणात उतरू शकतात.