आज राज्यातील 11 लोकसभा मतदारसंघातील मतदान पार पडत आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे विरूद्ध सुनेत्रा पवार यांच्यात लढत पाहायला मिळत आहे. सुरुवातीलपासून दोन्ही पवार कुटुंब भावनिक नसल्याचं सांगितलं जात असलं तरी आता मतदानाच्या दिवशी याला भावनिक किनार असल्याचं दिसून येत आहे. सकाळी मतदान केल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी थेट अजित पवारांचं काटेवाडीतील घर गाठलं. त्यांच्या या भेटीची मोठी चर्चा सुरू आहे. गेल्या काही दिवसात बारामती निवडणुकीच्या अपडेटकडे पाहिलं तर सुप्रिया सुळे यांच्या पाठिशी संपूर्ण पवार कुटुंब असताना दुसरीकडे अजित पवार एकटे असल्याचं दिसतं. आज सकाळी अजित पवार यांनी या संघर्षात मी एकटा नाही तर माझी आई सोबत असल्याचं म्हटलं होतं.
यानंतर सुप्रिया सुळे या त्यांच्या काकी आणि अजित पवारांच्या आई आशाताई पवार यांचा आशीर्वाद घेण्यासाठी काटेवाडीतील निवासस्थानी पोहोचल्या. सुप्रिया सुळेंनी अजित पवारांच्या घरी जाऊन त्यांच्या आईची भेट घेण्यावरुन राजकीय चर्चा सुरू झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अजित पवार सध्या निवडणुकीच्या तयारीसाठी बारामतीतील सहजीवन सोसायटीतील राहत आहेत. तर काटेवाडीतील घरात अजित पवार यांच्या आई राहतात. अजित पवारांनी सकाळी केलेल्य़ा वक्तव्यावर भावनिक स्वरुपात राजकीय प्रत्युत्तर देण्यासाठी सुप्रिया सुळेंनी ही भेट घेतल्याचं म्हटलं जात आहे. या भेटीदरम्यान सुप्रिया सुळे या एकट्या होत्या, त्यांच्यासोबत इतर कोणताही मोठा राजकीय नेता किंवा पदाधिकारी नसल्याचं सांगितलं जात आहे.
नक्की वाचा - मोठी बातमी! महायुतीच्या उमेदवाराला मतदान करण्यासाठी 500 रुपये अन् दारू वाटप?
काही तज्ज्ञांच्या मते ही सुप्रिया सुळेंची नवी खेळी असून यामुळे मतदारांवर परिणाम होऊ शकतो. मात्र सुप्रिया सुळे यांच्या या कृतीमुळे प्रत्यक्षात मविआला किती फायदा होईल हे निकालानंतर समोर येईल.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world