Supriya Sule News : सध्या लग्न म्हटलं की झगमगाट पाहायला मिळतो. लग्नाच्या बस्त्याचा खर्च लाखोंमध्ये जातो. साड्यांच्या किमतीही लाखोंची उड्डाणं घेतात. अशावेळी खासदार सुप्रिया सुळेंनी मात्र लेकीच्या लग्नात ३५ वर्षे जुनी पैठणी नेसल्याचं समोर आलं आहे. त्यांनीच आपल्या सोशल मीडियावरुन याची माहिती दिली. यावेळी त्यांनी तिच साडी पुन्हा नेसल्याचं कारण सांगत पैठणीच्या विणकरांचे आभार मानले.
लेकीच्या लग्नात ३५ वर्षांपूर्वीच्या आठवणींना उजाळा...
२० जून रोजी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांची कन्या रेवती सुळे विवाहबंधनात अडकली. रेवतीचं लग्न नागपुरचे प्रसिद्ध उद्योगपती अरुण लखानी यांचा पूत्र सारंग लखानी यांच्याशी झालं. मुंबईतील जिओ कन्व्हेन्शन सेंटरमध्ये हा विवाह सोहळा पार पडला. यावेळी मोठमोठे मान्यवर उपस्थित होते. दरम्यान या लग्नात रेवतीच्या पोशाखासह सुप्रिया सुळे यांच्या साडीचीही चांगलीच चर्चा रंगली. सुप्रिया सुळेंनी लेकीच्या लग्नात लाल रंगाचा काठ असलेली हिरव्या रंगाची पैठणी नेसली होती. ही पैठणी तब्बल ३५ वर्षे जुनी असल्याचं सुप्रिया सुळे यांनी आपल्या सोशल मीडियावरील पोस्टमध्ये म्हटलं.
विशेष म्हणजे त्यांनी ३५ वर्षांपूर्वीचा खास क्षणाचाही उल्लेख करीत पैठणीच्या विणकरांने आभार मानले. त्यांनी पोस्टमध्ये म्हटलंय,
मुलांचं लग्न हा प्रत्येक आई-वडिलांच्या आयुष्यातील आनंदाचा क्षण असतो. सुमारे ३५ वर्षांपूर्वी, ४ मार्च १९९१ रोजी 'वधू' म्हणून माझ्या लग्नात नेसलेली पैठणी 'नवरीची आई' म्हणून रेवती आणि सारंग यांच्या २० जून रोजी झालेल्या विवाहसोहळ्यात पुन्हा परिधान करण्याचा योग आला. ही पैठणी छत्रपती संभाजीनगर येथील विणकर बशीरजी यांनी अत्यंत कौशल्याने विणलेली आहे. ती पुन्हा नेसताना अनेक आठवणी जाग्या झाल्या आणि आनंदात आणखी भर पडली. काही गोष्टींचं सौंदर्य काळानुसार अधिकच खुलत जातं. या पैठणीत केवळ रेशमाचे धागे नाहीत, तर आठवणी, संस्कृती आणि आपल्या कारागिरांच्या कष्टांची समृद्ध परंपरा विणलेली आहे. म्हणूनच ही साडी नेसताना मी कारागिरांच्या अविश्रांत मेहनतीप्रती कृतज्ञ आहे. काही गोष्टींचं मोल कशातही चुकविता येत नाही, हेच खरं आमच्या आयुष्यातील हे क्षण अधिक सुंदर करणाऱ्या सर्व प्रतिभावान विणकरांचा अतिशय अभिमान आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world