Swabhiman Initiative: मुंबईतून महिला सक्षमीकरणाची एक अत्यंत प्रेरणादायी बातमी आहे. अदाणी इलेक्ट्रिसिटी, अदाणी फाउंडेशन आणि 'माविम' (MAVIM) यांच्या संयुक्त विद्यमाने राबवल्या जाणाऱ्या 'स्वाभिमान' उपक्रमाने यशाचे एक नवे शिखर सर केले आहे. या उपक्रमांतर्गत सुरू करण्यात आलेल्या स्वतेजा मार्ट आणि स्वतेजा किचनने अवघ्या 1 वर्षात 1 कोटी रुपयांच्या महसुलाचा टप्पा ओलांडला आहे. सार्वजनिक आणि खासगी भागीदारीतून महिला उद्योजकांना योग्य व्यासपीठ मिळाले, तर त्या जागतिक बाजारपेठेतही आपली नाममुद्रा उमटवू शकतात, याचे हे उत्तम उदाहरण ठरले आहे.
मंत्री अदिती तटकरे यांच्याकडून कौतुक
या नेत्रदीपक यशाची दखल घेत राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी नुकतीच स्वतेजा मार्टला भेट दिली. यावेळी त्यांच्यासोबत माविमच्या संचालक राजलक्ष्मी शाह (भाप्रसे) उपस्थित होत्या. यावेळी तटकरे यांनी महिलांनी लावलेल्या विविध स्टॉल्सची बारकाईने पाहणी केली आणि महिला उद्योजकांशी संवाद साधून त्यांचा उत्साह वाढवला.
विशेष म्हणजे, अदिती तटकरे यांच्या हस्ते स्वतेजा किचनचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी त्यांनी स्वतः स्विगीवरून ऑनलाइन ऑर्डर देऊन या डिजिटल उपक्रमाला एक नवी दिशा दिली. ज्या महिलांनी मोठ्या ऑर्डर्स यशस्वीपणे पूर्ण केल्या, त्यांना यावेळी धनादेश देऊन सन्मानित करण्यात आले.
4500 महिलांना मिळाला आधार
माविम आणि मुंबई महानगरपालिका यांच्या सहकार्याने चालवल्या जाणाऱ्या या 'स्वाभिमान' योजनेमुळे आजघडीला 380 पेक्षा जास्त महिला स्वयंसहाय्यता गटांचे सक्षमीकरण झाले आहे. या मोहिमेचा थेट फायदा मुंबईतील सुमारे 4500 महिलांना झाला आहे. या महिलांना केवळ बाजारपेठच उपलब्ध करून दिली नाही, तर त्यांना कौशल्य प्रशिक्षण, बचतीचे महत्त्व आणि नामवंत वित्तसंस्थांकडून कर्ज उपलब्ध करून देण्यात मोलाची मदत केली आहे.
स्वतेजा मार्ट आणि किचनच्या माध्यमातून आता या महिलांची उत्पादने आठवडी बाजार, मोठ्या कंपन्यांमधील दुकाने आणि ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर डामडौलात विक्रीसाठी उपलब्ध आहेत.
आर्थिक स्वातंत्र्याकडे वाटचाल
या सोहळ्यात बोलताना अदिती तटकरे म्हणाल्या की, अदाणी इलेक्ट्रिसिटी, अदाणी फाउंडेशन आणि माविम यांचा हा संयुक्त उपक्रम महिला सक्षमीकरणाचा एक आदर्श वस्तुपाठ आहे. स्वतेजा मार्ट आणि क्लाउड किचनमुळे महिलांना हक्काचे उपजीविकेचे साधन मिळाले असून त्या आता आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र झाल्या आहेत.
अदाणी इलेक्ट्रिसिटीच्या प्रवक्त्यानेही या यशावर समाधान व्यक्त केले. त्यांच्या मते, 1 कोटी रुपयांचा आकडा हा केवळ उत्पन्नाचा भाग नसून, त्या पलीकडे जाऊन महिलांमध्ये निर्माण झालेला आत्मविश्वास आणि त्यांची जिद्द हा या उपक्रमाचा खरा विजय आहे.
(अस्वीकार: नवी दिल्ली टेलिव्हिजन ही अदानी समुहाच्या AMG मीडिया नेटवर्क्स लिमिटेडची उपकंपनी आहे.)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world