एकेकाळी अंडरवर्ल्ड डॉन, स्वत:ला नामचीन गुंड म्हणवणारे ज्या पोलीस अधिकाऱ्यांना टरकून होते असे अधिकारी एकामागोमाग एक निवृत्त होऊ लागले आहेत. 31 जुलै हा एन्काऊन्टर स्पेशालिस्ट म्हणून लौकीक मिळवणाऱ्या दया नायक यांचा पोलिसी सेवेतील अखेरचा दिवस होते. त्याच दिवशी पुण्यामध्येही एका कणखर महिला पोलीस अधिकाऱ्याचीही निवृत्ती होती. स्वाती साठे हे नाव संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहे. स्वाती साठेंचे नाव एकून अनेक गुंड, कुख्यात बदमाश हे देखील टरकायचे. अत्यंत स्वच्छ प्रतिमेच्या कर्तव्यकठोर अधिकारी म्हणून स्वाती साठे यांनी लौकीक कमावला. स्वाती साठे यांच्याकडे बराचकाळ तुरुंग प्रशासनाची जबाबदारी होती. या काळात संजय दत्त, शायनी आहुजा, मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी याकूब मेमन, दहशतवादी अजमल कसाब, गँगस्टर अबू सालेम यांनी तुरुंगवास भोगला आहे.
( नक्की वाचा: पुण्यात वर्दीही असुरक्षित? गस्तीवरील पोलिसांना टोळक्याकडून मारहाण; गाडी अडवल्याचा राग अन्... )
संजय दत्त याला टाडाअंतर्गत अटक करण्यात आली आणि तुरुंगात आणण्यात आले तेव्हा त्याने तुरुंगातील कपडे घालण्यास नकार दिला होता. संजय दत्त हा हायप्रोफाईल आरोपी असल्याने पोलीस कर्मचारी त्याच्याशी थोड्याशा नरमाईने वागत होते. असं असलं तरी संजय दत्त तुरुंगातील कपडे घालण्यास नकार देत होता. हे जेव्हा स्वाती साठे यांना कळालं तेव्हा त्या तडक संजय दत्तला जिथे ठेवण्यात आलं होतं तिथे पोहोचल्या आणि म्हणाल्या की, “संजू, तू बातों से मानेगा या लातों से?” स्वाती साठेंच्या आवाजातील जरब ऐकून संजय दत्त नरमला आणि त्याने गुपचूप तुरूंगातील कपडे घातले.
स्वाती साठेंचा रुद्रावतार पाहून अतीक अहमदही घाबरला
उत्तर प्रदेशातील कुख्यात गुंड आणि नंतर राजकारणी बनलेला अतीक अहमद याला एका प्रकरणात मुंबईतील तुरुंगात ठेवण्यात आले होते. तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याविरोधात समाजवादी पक्षाने आंदोलन केले होते, या प्रकरणात अतीक अहमद याला अटक करण्यात आली होती. अतीकने तुरुंगात आल्यानंतर मग्रुरीने म्हटले की मला माझा खानसामा म्हणजेच जेवण बनविणारा पाहीजे. स्वाती साठे यांनी त्यास स्पष्ट शब्दात नकार दिला. त्यांनी अतीकला बजावले की माझ्या तुरुंगात जो येतो तो इतलेच जेवण जेवतो. यावर अतीक अहमदने भडकून म्हटले की मी इतक्या तुरुंगात राहिलो आहे आजपर्यंत माझ्याशी कोणीही वरच्या पट्टीत बोलण्याची हिम्मत केली नाहीये. यावर साठे यांनी त्याला त्याच्याच पट्टीत उत्तर देताना म्हटले की, “तुमको क्या लगा कि यहां मुजरा देखने मिलेगा? अगर चिल्लाना बंद नहीं किया तो अंडा सेल में डाल दूंगी”
( नक्की वाचा: एन्काऊन्टर स्पेशालिस्टचं 'वादळ' रिटायर, खऱ्याखुऱ्या 'सिंघम'ची निवृत्ती )
सध्याचे सपाचे आमदार अबू आझमी यांनी मध्यस्ती करत अतीक अहमदच्या कानात स्वाती साठे यांच्या स्वच्छ प्रतिमेबद्दल आणि त्यांच्या शिस्तीबद्दल सांगितले. यानंतर अतीक अहमद शांत झाला आणि दोन रात्री तो जमिनीवरच झोपला. तुरुंगातून बाहेर जाताना अतीक अहमदने स्वाती साठेंना सांगितले की जेल असेच असायला हवे. आमच्यासारख्या लोकांना तुरुंगात सुखसुविधा लागतात, तुम्हाला तर उत्तर प्रदेशातील जेलमध्ये यायला पाहीजे.
पार्ट्या बंद,योगासने सुरू
स्वाती साठे यांनी आर्थर रोड तुरुंग प्रशासनाचा भार सांभाळण्यापूर्वी या तुरुंगात पार्ट्या रंगायच्या. कोणत्या गँगस्टरचा वाढदिवस असेल तर जल्लोष साजरा केला जायचा. स्वाती साठे यांनी येताच हे सगळे प्रकार तत्काळ बंद केले. त्यांनी तुरुंगात सांस्कृतिक कार्यक्रम सुरू होईल. पार्ट्यांऐवजी तुरुंगात भजने, गजला यांचे सूर ऐकू येऊ लागले. योगाचे वर्गही भरवले जाऊ लागले आणि या सगळ्याला तुरुंगातील कैदी चांगला प्रतिसाद देऊ लागले.
तुरुंगात गँगवॉर टाळण्यासाठी प्रचंड मेहनत
तेलगी स्टँपपेपर घोटाळ्यामध्ये अनेक बड्या पोलीस अधिकाऱ्यांची आणि सरकारी अधिकाऱ्यांची नावे येऊ लागली होती. साध्या हवालदारापासून पोलीस आयुक्तांपर्यंत अनेकांना यात अटक करण्यात आली होती. हे सगळे जेव्हा तुरुंगात येऊ लागले तेव्हा ते स्वाती साठे यांच्यासाठी सगळ्यात मोठे आव्हान होते. यातल्या एकाही हायप्रोफाईल कैद्याला स्वाती साठे यांनी 'विशेष' सुविधा दिली नाही. एक काळ असा होता जेव्हा एकमेकांचा मुडदा पाडण्यासाठी आसुसलेले गँगस्टर तुरुंगात आमनेसामने येऊ लागले होते. तुरुंगात गँगवॉर भडकण्याची यामुळे भीती निर्माण झाली होती. हे होऊ नये यासाठी या गँगस्टरना वेगवेगळ्या बराकीत ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. बरीच काळजी घेतल्यानंतरही अबू सालेम याच्यावर मुस्तफा डोसाने चमच्याला धार लावून हत्यार बनवत हल्ला केला होता. स्वाती साठे या कर्तव्यकठोर आणि शिस्तप्रिय असल्याने तत्कालीन गृहमंत्री आर.आर.पाटील यांच्या आवडत्या अधिकाऱ्यांमध्ये त्यांचा समावेश होता.
( नक्की वाचा: अबब! घोटाळेबाज माजी मनपा आयुक्ताचे रेटकार्ड आले समोर, कमिशनचे आकडे पाहून डोळे फिरतील )
स्वाती साठे या कर्तव्यकठोर असल्या तरी कैद्यांनी सुधारावे ही त्यांची मनोमन इच्छा असायची. बहुतांश काळ त्यांनी कैद्यांसोबत घालवला असल्याने त्यांची मानसिकता, त्यांचे प्रश्न याबद्दल त्यांना उत्तम जाण आहे. तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर तो कैदी सन्मानाने जगू शकावा यासाठी त्याच्या बदल घडणे गजरेचे असल्याचे स्वाती साठे यांचे मत आहे. त्यासाठी त्यांना कठोर भूमिका स्वीकारणे गरजेचे असते. यामुळेच तुरुंगातून बाहेर पडल्यानंतरही बहुसंख्य कैदी त्यांचे ऋण मानतात.