जाहिरात

Daya Nayak Retirement: एन्काऊन्टर स्पेशालिस्टचं 'वादळ' रिटायर, खऱ्याखुऱ्या 'सिंघम'ची निवृत्ती

Daya Nayak Retirement : अंडरवर्ल्डचं कंबरडं मोडण्यात ज्या अधिकाऱ्यांनी मोठी भूमिका बजावली आहे, त्या अधिकाऱ्यांमध्ये दया नायक यांचाही समावेश होतो. 

Daya Nayak Retirement: एन्काऊन्टर स्पेशालिस्टचं 'वादळ' रिटायर, खऱ्याखुऱ्या 'सिंघम'ची निवृत्ती
मुंबई:

एन्काऊन्टर स्पेशालिस्ट म्हणून प्रसिद्धी मिळालेल्या दया नायक यांच्या बंदुकीतून गेल्या 21 वर्षांमध्ये एकही गोळी सुटलेली नाही. त्यांनी त्यांच्या सर्व्हिस रिव्हॉल्वरला शेवटचा हात 2004 साली घातला होता. मालाडमध्ये एका कथित गँगस्टरला ठार मारण्यासाठी त्यांनी बंदूक उगारली होती. दया नायक यांच्या वांद्रेतील कार्यालयातील टेबलवरील रिव्हॉल्व्हरमुळे त्यांना 'एन्काऊन्टर स्पेशालिस्ट ऑफिसर' म्हणून ओळख मिळाली. अंडरवर्ल्डचं कंबरडं मोडण्यात ज्या अधिकाऱ्यांनी मोठी भूमिका बजावली आहे, त्या अधिकाऱ्यांमध्ये दया नायक यांचाही समावेश होतो. 

आपल्या कारकिर्दीमध्ये दया नायक यांनी 80 गँगस्टर आणि दहशतवाद्यांना यमसदनी पाठवले आहे. त्यांच्या याच 'सिंघम' स्टाईलमुळे त्यांचं नाव जगभरातील माध्यमांमध्ये चर्चिले गेले आणि त्यांना डोळ्यासमोर ठेवत बॉलीवूड चित्रपट काढण्यात आले. मुंबई पोलीस दलात अधिकाऱ्यांची एक पथक एन्काऊन्टर स्पेशालिस्ट स्क्वॉड म्हणून प्रसिद्ध झालं होतं. ज्येष्ठतेमध्ये त्यातले काही वरिष्ठ होते तर काही त्यांना ज्युनिअर होते. या  स्क्वॉडमधल्या दोन प्रमुख अधिकाऱ्यांमध्ये  प्रदीप शर्मा आणि दया नायक हे दोन अधिकारी आहेत. 

या स्क्वॉडच्या अधिकाऱ्यांमधल्या इतर नावांमध्ये विजय साळसकर, प्रफुल भोसले, रवींद्र आंग्रे ही नावे देखील प्रचंड चर्चित आणि गाजलेली नावे आहेत. मी पत्रकारितेमध्ये नव्याने आलो होतो तेव्हापासून म्हणजेच 1999 सालापासून मी दया नायक यांची कारकीर्द जवळून पाहिली आहे. दया नायक यांच्या आयुष्यातील चढउतारही मला जवळून पाहाता आले.  "बॉम्बे आफ्टर अयोध्या" (Bombay After Ayodhya) या माझ्या पुस्तकात मी दया नायक यांच्याबद्दलही लिहिले आहे. त्या भागाचा हा सारांश आहे. 

…आणि दया नायक यांना अश्रू अनावर झाले

उंच, धिप्पाड, मिशा राखून असलेले पोलीस अधिकारी दया नायक यांचे नाव 1990 सालापासून एन्काऊन्टर स्पेशालिस्ट म्हणून उदयाला येऊ लागले होते. 'दया' म्हणजे माफ करणे, मात्र गुंडांसाठी ते याच्याविरूद्ध होते. गुंडांबद्दल या अधिकाऱ्याने 'दया'माया दाखवली नाही. यामुळे त्यांचे नाव घेतले की बडबडे गँगस्टरही थरथर कापत होते. अशा या अधिकाऱ्याला तेव्हा अश्रूंचा बांध थांबवणे अवघड झाले होते. माझ्या कॅमेऱ्याने दया नायक यांना रडताना टीपले होते. त्यांची ही बाजू मी कधीही पाहिली नव्हती त्यामुळे ही त्यांची अस्वस्थ करणारी स्थिती  ही मनाला झिणझिण्या आणणारी होती.  

एक धडाकेबाज अधिकारी, वरिष्ठांचा लाडका आणि सदैव तत्पर असणारे, दया नायक यांनी कॅमेऱ्याचा कधीही संकोच वाटला नाही. त्यांनी एकदा कॅमेऱ्यासमोर हातात कलाशनिकोव्ह घेऊनही पोझ दिली होती. 

पुरुषही रडतात, पोलीस रडतात आणि ज्यांना वाटतं की रडू शकत नाही किंवा हरू शकत नाही ती मंडळी पोलिसांच्या वर्दीमागे असलेला मानवी चेहरा पाहण्यात कमी पडतात.  

( नक्की वाचा : एन्काऊंटर स्पेशलिस्ट दया नायक कोण आहेत? बाबा सिद्दीकी हत्याकांडाचा करणार तपास! )

अंतर्गत संघर्षाचा बळी ?

दया नायक यांच्याविरोधात बेहिशोबी मालमत्तेप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. जो लौकीक त्यांनी इतक्या वर्षांच्या मेहनतीने कमावला होता तो एका क्षणात धुळीस मिळाला होता. अटकेची भीती त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होती. कर्नाटकच्या किनारपट्टी भागातील एका गावातून आलेला दया नायक नावाचा मुलगा मुंबई आला. पोटापाण्यासाठी त्याने लहानसहान नोकऱ्या केल्या. एमपीएससीची परीक्षा झाल्यानंतर 1995 साली हाच दया नायक पोलीस उपनिरीक्षक म्हणून रुजू झाला.

 जुहू पोलीस ठाण्यात प्रदीप शर्मा यांच्या नजरेस दया नायक पडले होते. गुन्ह्याची उकल करण्याच्या दया नायक यांच्या पद्धतीवर ते खूश झाले होते. प्रदीप शर्मा यांनी दया नायक यांना आपल्या पथकात सामील करून घेतले. या दोघांनी पुढे अनेक एन्काऊन्टर केले. दया नायक यांचे नाव अल्पावधीत संपूर्ण पोलीस दलाला कळाले. अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांचे ते लाडके बनले. दया नायक यांनी वेगाने केलेल्या प्रगतीमुळे पोलीस दलातील काहीजण त्यांच्यावर नाराजही होते आणि काही जळतही होते.  

अज्ञातस्थळी दिलेली मुलाखत

2006 साली एका मराठी वर्तमानपत्राने एक बातमी छापली होती. दया नायक यांच्यासाठी ती पहिली डोकेदुखी बनली होती. बातमी होती की, दया नायक यांनी त्यांच्या मूळगावी म्हणजेच कर्नाटकातील येन्नेहोळमध्ये आपल्या आईच्या नावाने म्हणजेच राधा नायक यांच्या नावाने एक हायटेक शाळा सुरू केली. या शाळेच्या उद्घाटनाला अमिताभ बच्चन, सुनील शेट्टी आणि आफताब शिवदासानींसारखी सेलिब्रिटी मंडळी उपस्थित होती. 

दया नायक यांनी या शाळेसाठी कोट्यवधी रुपये खर्च केले होते असे बातमीत म्हटले होते, ज्यामुळे सगळ्यांच्या भुवया आश्चर्याने उंचावल्या होत्या. एक साधा पोलीस उपनिरीक्षक इतका पैसा खर्च करून शाळा कशी काय उभी करू शकतो असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला होता. आरोप करण्यात येऊ लागला की दया नायक यांनी आपल्या अधिकारांचा गैरवापर करत उद्योगपतींकडून खंडण्या उकळल्या होत्या. दया नायक यांच्या उत्पन्नाचा स्त्रोत काय हे तपासण्यासाठी चौकशी सुरू करण्यात आली आणि लाचलुचपत प्रतिबंक विभागाने त्यांच्याविरोधात गुन्हा देखील दाखल केला. यानंतर दया नायक हे अज्ञातवासात गेले होते आणि त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्जही दाखल केला. हा अर्ज फेटाळल्याने दया नायक यांची अटक निश्चित मानली जात होती. त्यावेळी दया नायक यांनी मला एका अज्ञातस्थळी बोलावून सविस्तर मुलाखत दिली होती.  या मुलाखतीनंतर ते पोलिसांपुढे सरेंडर झाले होते.  

दोन महिने तुरुंगवास

ज्यावेळी मी मुलाखत घेत होतो तेव्हा मला दया नायक हे खचलेले आणि हताश दिसले. आपल्याच काही सहकाऱ्यांनी आपल्याविरोधात रचलेले हे कुभांड असल्याचा आरोप केला होता. पोलीस दलातील अंतर्गत संघर्षाचा मी बळी ठरल्याचे विधान त्यांनी या मुलाखतीत केले होते. याच प्रकरणात दया नायक यांच्या पत्नी आणि मुलांवरही गुन्हा दाखल करण्यात आला होता. दया नायक यांनी 2 महिने तुरुंगात घालवले होते. 60 दिवसांच्या कालावधीमध्ये पोलीस त्यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल करू न शकल्याने त्यांना जामीन मंजूर करण्यात आला. तपास यंत्रणांना दया नायक यांच्याविरोधात सबळ पुरावे सापडले नाहीत ज्यामुळे अखेर दया नायक यांना निर्दोष घोषित करण्यात आले.  

शर्मांसोबतच्या मतभेदामुळे सगळे चित्र पालटले

रस्त्यावर विविध गँग एकमेकांचे मुडदे पाडण्यासाठी आसुसलेल्या होत्या, त्याचवेळी एक समांतर गँगही उदयास आली होती. ही गँग होती गँगस्टरना संपवण्यासाठी उभ्या राहिलेल्या जनतेच्या रक्षकांची. मी आणि माझे पत्रकार मित्र अनेक पोलिसांशी बोलायचो. त्यातून ही गोष्ट अधिक स्पष्ट होत गेली. प्रदीप शर्मा आणि दया नायक यांनी मिळून 80 गँगस्टरना यमसदनी पाठवले होते आणि यामुळे ते 'हिरो' बनले होते. गँगस्टरही त्यांच्या नावाने थरथर कापायचे. 21 व्या शतकाच्या सुरुवातीला या दोघांवर काही बॉलीवूड चित्रपटही बनले होते.  चित्रपटांमध्ये दोन मित्रांच्या मैत्रीमध्ये नव्या पात्रांमुळे फूट पडते तसे प्रत्यक्षातही घडल्याचे बोलले जाते. 

शर्मांच्या पथकामध्ये काही अधिकारी नव्याने सामील झाल्यानंतर पथकामध्ये मतभेद होऊ लागले. या खटक्यांमुळे प्रदीप शर्मा आणि दया नायक यांच्या घट्ट नात्याची वीण सैल होऊ लागली. चित्रपटात दाखवण्यात आलेले पात्र नेमके कोणत्या अधिकाऱ्यावर बेतले आहे अशा चर्चांमुळे शर्मा-नायक यांच्यातील मतभेद आणखी वाढले. नायक यांच्या वाढत्या प्रसिद्धीमुळे त्यांचे वरिष्ठ झाकोळले गेल्याचीही चर्चा सुरू झाली. यामुळे दया नायक यांचे वजन कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. दया नायक यांना बेहिशोबी मालमत्ता प्रकरणात निर्दोष घोषित केल्यानंतर त्यांना पुन्हा सेवेत घेण्यात आले.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com