Navi Mumbi News : नवी मुंबईत एका खासगी शाळेतील शिक्षिकेने तिच्याच शाळेत शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत अश्लील व्हिडिओ कॉल केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या गंभीर घटनेप्रकरणी कोपरखैरणे पोलीस ठाण्यात संबंधित शिक्षिकेविरोधात पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाने आरोपी शिक्षिकेला एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावली असून, या घटनेमुळे नवी मुंबई परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सदर शिक्षिका सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवरून या अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत वारंवार चॅट करत होती. या संवादादरम्यान तिने विद्यार्थ्यासोबत अर्धनग्न अवस्थेत अश्लील व्हिडिओ कॉल केल्याचे समोर आले आहे. हा प्रकार काही दिवस सुरू होता. मात्र, अखेर त्या विद्यार्थ्याने याबाबतची माहिती आपल्या पालकांना दिली.
(नक्की वाचा- धक्कादायक! पनवेल महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांवर बलात्काराचा गुन्हा, बळजबरीने गर्भपात केल्याचाही आरोप)
पालकांनी या घटनेचे गांभीर्य लक्षात घेत तातडीने कोपरखैरणे पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. पालकांच्या तक्रारीनुसार, शिक्षिकेच्या या वर्तनामुळे अल्पवयीन मुलाच्या मानसिक आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत संबंधित शिक्षिकेला ताब्यात घेतले आणि तिच्यावर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवला.
आरोपी शिक्षिकेला न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने तिला एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. कोपरखैरणे पोलिसांनी सांगितले की, या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. तपासामध्ये शिक्षिकेने यापूर्वी इतर कोणत्याही विद्यार्थ्यांसोबत असे प्रकार केले आहेत का? तिच्या मोबाईल फोनमधून किंवा सोशल मीडिया अकाऊंटवरून आणखी काही महत्त्वपूर्ण पुरावे मिळतात का? याची माहिती घेतली जात आहे. पोलिसांनी शिक्षिकेचा मोबाईल फोन जप्त केला असून त्याचा तांत्रिक तपासही सुरू करण्यात आला आहे.
(नक्की वाचा - ईडीच्या अधिकाऱ्यांना पाहताच घराचं दार बंद केलं; वसई-विरारचे माजी आयुक्त अनिल कुमार यांच्या घरावर छापा)
पालकांना पोलिसांचे आवाहन
या घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी सर्व पालकांना एक महत्त्वाचे आवाहन केले आहे. मुलांच्या मोबाईल आणि सोशल मीडियाच्या वापरावर पालकांनी लक्ष ठेवावे. तसेच, अशा प्रकारचे कोणतेही गैरप्रकार किंवा संशयास्पद वर्तन आढळल्यास तातडीने पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.