अविनाश पवार, पुणे
महाराष्ट्रातील शिक्षकांची कमतरता भरून काढण्यासाठी आणि बेरोजगार पदवीधरांना अध्यापनासाठी तयार करण्याच्या उद्देशाने एक नवा कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. मात्र या कार्यक्रमावरून आता वाद निर्माण झाला आहे. 'लीडरशिप फॉर इक्विटी' आणि 'टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस' या संस्थांनी मिळून 'साधना फेलोशिप' नावाचा सहा महिन्यांचा विशेष कार्यक्रम सुरू केला आहे.
या कार्यक्रमांतर्गत उमेदवारांना 400 तासांचे सखोल प्रशिक्षण दिले जाईल, तसेच त्यांना दरमहा 5,000 रुपये मानधनही दिले जाईल. यात डिजिटल शिक्षण, नेटवर्किंग आणि नेतृत्व कौशल्ये विकसित करण्यावर भर दिला जाणार आहे. या उपक्रमाचा मुख्य उद्देश केवळ शिक्षक तयार करणे नसून, त्यांना सामाजिक बदलाचे वाहक बनवणे आणि रोजगाराच्या संधी मिळवून देणे हा आहे.
(नक्की वाचा- Nagpur Vande bharat: नागपूर-पुणे वंदे भारत एक्सप्रेसचा 10 ऑगस्टला शुभारंभ; ट्रेनचा मार्ग, तिकीट दर किती?)
वादाचे कारण आणि शिक्षण क्षेत्रातील नाराजी
या फेलोशिपवर अनेक स्तरातून टीका होत आहे. शिक्षण क्षेत्रात आधीच 'टीईटी' उत्तीर्ण झालेले आणि सर्व शैक्षणिक पात्रता असूनही नोकरीच्या प्रतीक्षेत असलेले हजारो बेरोजगार तरुण आहेत. अशा स्थितीत, नव्या उमेदवारांना प्रशिक्षण देणे हे अन्यायकारक असल्याची भावना व्यक्त होत आहे.
(नक्की वाचा- Actress Gautami Kapoor: मुलीच्या वाढदिवसाला भेट दिला व्हायब्रेटर, अभिनेत्रीने अभिमानाने सांगितला किस्सा)
काही शिक्षण अधिकाऱ्यांनीही यावर नाराजी व्यक्त केली आहे. 'साधना फेलोशिप'द्वारे शिक्षण विभागात स्लो पॉयझनिंग केले जात आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. सूत्रांच्या माहितीनुसार, शिक्षण खात्याकडून या कार्यक्रमाबाबत कारवाई करण्यासाठी पत्रही जारी होण्याची शक्यता आहे. शिक्षकांची कमतरता दूर करण्यासाठी सुरू झालेला हा कार्यक्रम आता वादाच्या केंद्रस्थानी आला आहे.