Mumbai Political news : शिवसेना ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांची आज पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतर नाराजी दूर झाली की नाही लवकरच समजेल, असं तेजस्वी घोसाळकर यांनी म्हटलं.
तेजस्वी घोसाळकर यांनी दोन दिवसांपूर्वी आपल्या संघटनात्मक पदाचा राजीनामा दिला होता. स्थानिक विभाग प्रमुख आणि विभाग संघटक यांच्याबद्दल नाराजी व्यक्त करत तेजस्वी घोसाळकर यांनी पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर तेजस्वी घोसाळकर पक्ष सोडणार असल्याच्या चर्चा जोर धरू लागल्या होत्या. या सर्व पार्श्वभूमीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांना भेटीसाठी मातोश्रीवर बोलावले होते. त्यानुसार तेजस्वी घोसाळकर यांनी आज उद्धव ठाकरे यांची भेट घेतील.
(नक्की वाचा- India-Pakistan Ceasefire : युद्धबंदीच्या पद्धतीवरून चीन पाकिस्तानवर नाराज? श्रेय घेण्यासाठी चढाओढ)
तेजस्वी घोसाळकर यांनी भेटीनंतर म्हटलं की, "माझी आणि उद्धव ठाकरे यांची भेट झाली. माझ्या ज्या काही तक्रारी होत्या, त्या मी उद्धव ठाकरे यांच्यासमोर मांडल्या आहेत. त्यांनी त्याबद्दल काही उत्तरे दिली, काही उत्तरे अजून येणे बाकी आहे. त्यामुळे सध्या मी काही सांगणार नाही. नाराजी दूर झाली का याबाबत तुम्हाला लवकरच समजेल."
"स्थानिक स्तरावर काही गोष्टी स्पष्ट होणे त्यावेळी गरजेचं होतं. पण त्या झाल्या नाहीत. त्यामुळे इथे यावं लागलं. ज्या काही गोष्टी होत्या त्याबाबत उद्धव ठाकरेंशी चर्चा केली. मी अजून कुठल्याही पक्षांमध्ये जाण्याचा विचार केलेला नाही. मी गद्दारी केलेली नाही. अजूनही ठाकरेंसोबत आहे. मी या सगळ्यांवर विचार करेल आणि सांगेल", असंही तेजस्वी घोसाळकर यांनी म्हटलं.
(नक्की वाचा- Saamana Editorial : "सिंदूरही विकले गेले, तिरंग्याचा सौदाच झाला", भाजपच्या तिरंगा यात्रेवर 'सामना'तून घणाघात)
तेजस्वी घोसाळकर यांनी विभाग प्रमुख आणि विभाग संघटक यांच्या बद्दल अनेक वेळा नाराजी व्यक्त केली होती. मात्र तक्रारी करून सुद्धा पक्षाकडून दखल न घेतल्यामुळे त्यांनी राजीनामा दिल्याची माहिती आहे. मात्र तेजस्वी घोसाळकर यांनी राजीनामा दिल्यानंतर उद्धव ठाकरेंनी त्यांच्याशी फोन करून चर्चा केली होती. त्यानंतर आज ही भेट झाली आहे.