
Saamana Editorial : पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय सैन्याने सैन्याने राबवलेल्या साहसी 'ऑपरेशन सिंदूर'चं देशभरात कौतुक होत आहे. मात्र पाकिस्तानवर भारत वरचढ होत असताना अचानक शस्त्रसंधी लागू करण्यात आली, यावरुन अनेक प्रश्न उपस्थित होत आहे. पाकिस्तानला धडा शिकवून पहलगाम हल्ल्याचा बदला घेतल्याबद्दल भाजप आता देशभर तिरंगा यात्रा काढणार आहे. यावरुन शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनातून टीका करण्यात आली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
युद्ध पाकिस्तानच्या दहशतवादापासून सुरू झाले आणि अमेरिकेच्या व्यापारापर्यंत येऊन थांबले. टेबलखालून हा सौदा झाला, यात सिंदूर विकले गेले. तिरंग्याचा सौदा करुन तिरंग्याची यात्रा काढून भाजपवाले लोकांना मुर्ख बनवत आहेत. भाजपवाल्यांना तिरंगा हाती धरण्याचा नैतिक अधिकारचं नाही, असं सामनातून म्हटलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावरही टीका करून पाच प्रश्न सामानातून उपस्थित करण्यात आले आहेत.
(नक्की वाचा- India vs Pakistan : भारताची पंगा घेऊन पाकिस्तानवर कर्ज घेऊनही भीक मागायची वेळ! किती झालं नुकसान?)
सामनाच्या अग्रलेखात नेमकं काय म्हटलंय?
"भारताने पाकिस्तानला धडा शिकवला नाहीच. उलट डोनाल्ड ट्रम्प यांची गुलामी पत्करली. सोमवारी रात्री देशाला संबोधन वगैरे करताना मोदी यांनी पाकिस्तानला धडा शिकविल्याचे जे प्रवचन झोडले ते निरर्थक आहे. भाजप अनेक उत्सव साजरा करत असतो. आता त्यांनी ‘डोनाल्ड तात्या'च्या नावाने एक कार्निव्हल भरवून त्यात सामील व्हावे. तिरंगा यात्रा कसली काढताय? भारतीय सैन्य पाकिस्तानवर चढाई करायला सज्ज असतानाच डोनाल्ड ट्रम्प पाकिस्तानच्या मदतीला धावतात व सार्वभौम भारत राष्ट्राला युद्धभूमीतून माघार घ्यायला लावतात. युद्ध पाकिस्तानच्या दहशतवादापासून सुरू झाले आणि अमेरिकेच्या व्यापारापर्यंत येऊन थांबले. टेबलाखाली सौदा झाला. त्यात सिंदूरही विकले गेले. तिरंग्याचा सौदाच झाला व आता तिरंग्याची यात्रा काढून भाजपवाले लोकांना मूर्ख बनवत आहेत. तिरंगा हाती धरण्याचा नैतिक अधिकार तुम्ही गमावला आहे", अशी टीका सामनातून करण्यात आली.
"भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे सध्याचे नेतृत्व म्हणजे एक फसलेला तमाशा आहे. ‘ऑपरेशन सिंदूर' यशस्वी झाल्याचा उत्सव साजरा करण्याचे त्यांनी ठरवले असून देशभरात तिरंगा यात्रा काढण्याची घोषणा भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी केली. मृतांच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा हा निर्लज्ज प्रकार आहे. पहलगाम हल्ल्याचा बदला पूर्ण झाला नसताना अशा यात्रा काढणे व राजकारण करणे कोणत्याही राजकीय पक्षाला शोभत नाही. मुळात ‘ऑपरेशन सिंदूर' पूर्ण होण्याआधीच प्रे. डोनाल्ड ट्रम्प यांनी धमकी देऊन भारताला युद्धातून माघार घेण्यास भाग पाडले. पाकिस्तानचा पराभव निश्चित असताना पंतप्रधान मोदी यांनी व्यापाराच्या लोभापायी ट्रम्प यांची धमकी मान्य केली व युद्ध बंद केले. यात ‘सिंदूर'चा बदला कोठे पूर्ण झाला? त्यामुळे एकाच वेळी ‘सिंदूर' आणि ‘तिरंगा' यांचा अपमान या लोकांनी केला. तिरंगा यात्रा हे राजकीय थोतांड आहे. भाजप अध्यक्ष डॉ. जे. पी. नड्डा यांनी व त्यांच्या पक्षाने तिरंगा यात्रा काढून विजयाचा जल्लोष करणे म्हणजे सिंदूर गमावलेल्या त्या माता-भगिनींच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखे आहे", असा घणाघात सामनातून करण्यात आला आहे.
( नक्की वाचा : Video : 'पराभवानंतरही ढोल वाजवण्याची पाकिस्तानची जुनी खोड, POK रिकामं करा', भारतानं ठणकावलं )
सामनातून उपस्थित केलेले पाच प्रश्न
पहलगाम हल्ल्याबद्दल सगळ्यात आधी गृहमंत्री अमित शहा यांचा राजीनामा घेतला पाहिजे. तिरंगा यात्रा जे काढत आहेत त्यांना या देशाचे पाच प्रश्न आहेत.
- पहलगाम हल्ला भारतीय हद्दीत झाला. मग त्याची जबाबदारी देशाच्या गृहमंत्र्यांनी घ्यायला नको काय? गृहमंत्री अमित शहा यांनी 26 हत्यांबाबतची चूक मान्य केली. त्यामुळे त्यांना बडतर्फ का करू नये?
- पहलगाम हल्ल्यातले ते पाच-सहा दहशतवादी सापडले नाहीत. ते गेले कोठे? भारताने पाकचे 11 सैनिक मारले. त्यापेक्षा हे पहलगामचे अपराधी मारायला नकोत काय? ही जबाबदारी फक्त अमित शहांचीच आहे. ते महाशय सध्या कोठे आहेत?
- पाकिस्तानला भारत अशी जबरदस्त अद्दल घडवणार होता की, पाकिस्तान पुन्हा जमिनीवरून उठणार नाही असे सांगितले गेले. आज पाकिस्तानात युद्ध जिंकल्याचा जल्लोष सुरू आहे तो कशाच्या जोरावर?
- पाकव्याप्त कश्मीरवर कब्जा मिळविण्यासाठी हे युद्ध होते? मग किती इंच ‘पीओके' भारताने मिळवले?
- अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी भारत-पाक युद्ध आपण थांबवले असल्याची घोषणा वॉशिंग्टनमधून केली. हे एका सार्वभौम राष्ट्रावरचे आक्रमण आहे. पंतप्रधान मोदींना हे मान्य आहे काय?
हे पाच प्रश्न महत्त्वाचे आहेत व त्यांची उत्तरे पंतप्रधान मोदी आणि त्यांचे आंधळे भक्त देत नाहीत तोपर्यंत तिरंगा हाती घेऊन यात्रा काढण्याचे अधिकार त्यांना नाहीत, असं 'सामना'तून म्हटलं आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world