Thane News: बलात्कार आणि फसवणूक अशा गंभीर आरोपांअंतर्गत तुरुंगात असलेल्या तरुणाला लग्न करण्यासाठी न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. मीरा रोड येथील एका तरुणाला ठाणे येथील विशेष न्यायालयाने अस्थायी जामीन मंजूर केला आहे. तक्रारदार 20 वर्षीय तरुणीने आरोपी तरुणासोबत विवाह करण्याची इच्छा व्यक्त केल्यामुळे हा जामीन देण्यात आला आहे.
आरोपी झीशान मेराज अहमद सिद्दीकी (वय 23) आणि पीडित तरुणीचा 2024 च्या सुरुवातीला उत्तर प्रदेशातील त्यांच्या मूळ गावी नातेवाईकांच्या माध्यमातून परिचय झाला होता. दोन्ही कुटुंबांमध्ये लग्नाची बोलणी सुरू होती. तक्रारदार तरुणीने दिलेल्या माहितीनुसार, ऑगस्ट 2024 मध्ये झीशानने तिला मीरा रोड येथे असलेल्या बगडेकर कॉलेजजवळ त्याच्या बहीण हीनाच्या घरी नेले. 'मुंबई मिरर'ने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
(नक्की वाचा- Viral VIDEO: फोनवरचं बोलणं ऐकून Uber ड्रायवरने गाडी थांबवली अन्... तरुणीच्या आयुष्यभर लक्षात राहील असा क्षण)
हीनाने तिला दूध दिले, ज्यामुळे तिला चक्कर आली आणि ती बेशुद्ध झाली. शुद्ध आल्यावर झीशानने तिच्यावर नशेच्या स्थितीत बलात्कार केल्याचे तिला जाणवले. यानंतर झीशानने लग्नाचे आश्वासन देत हीनाच्या घरी आणि नंतर ठाण्यातील सॉल्स्टिस इन रेसिडेन्सी येथे तिच्याशी वारंवार शारीरिक संबंध ठेवले. मात्र नंतर त्याने संपर्क तोडून टाकला.
तरुणीच्या कुटुंबाने संपर्क साधल्यावर झीशानच्या कुटुंबाने चार ते पाच वर्षे थांबायला सांगितले आणि नंतर लग्नाला नकार दिला. त्यानंतर फेब्रुवारी 2024 ते ऑक्टोबर 2025 या कालावधीतील घटनांचा उल्लेख करून तरुणीने नया नगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली.
(नक्की वाचा- Palghar News: झडप घातली, दप्तरामुळे वाचला जीव; पाचवीतल्या पोरांनी बिबट्याला पळवलं)
गुन्हा दाखल आणि अटक
पोलिसांनी झीशानविरुद्ध BNS अंतर्गत गुन्हा दाखल केला असून, गुन्ह्यास प्रोत्साहन दिल्याबद्दल त्याची बहीण हीना हिलाही सहआरोपी केले. झीशानला 1 नोव्हेंबर रोजी अटक करण्यात आली होती. त्याने सर्व आरोप फेटाळून लावत, हे संबंध सहमतीने झाले होते असा दावा केला होता.
न्यायालयाचा निर्णय आणि जामीन
21 नोव्हेंबर रोजी, विशेष न्यायाधीश डी. आर. देशपांडे यांच्या खंडपीठासमोर हे प्रकरण आले. दोन्ही पक्षांनी विवाह करण्याची इच्छा व्यक्त केली. तक्रारदार तरुणीने देखील न्यायालयात उपस्थित राहत लग्नास आपली सहमती दर्शवली. त्यामुळे न्यायालयाने झीशानला 23 नोव्हेंबर ते 27 नोव्हेंबरपर्यंत अंतरिम जामीन मंजूर केला. 25 नोव्हेंबर रोजी दोघांचा निकाह नियोजित आहेत.
न्यायालयाने घातल्या अटी
झीशानला 25000 रुपयांचा बॉण्ड सादर करावा लागेल. पोलिसांना लग्न समारंभाचे तपशील द्यावे लागतील. या काळात कोणतेही गैरवर्तन टाळावे लागेल आणि 28 नोव्हेंबर रोजी पुन्हा न्यायालयात हजर व्हावे लागेल.