मनोज सातवी, पालघर
Palghar News: पुणे, नाशिक, अहिल्यानगर, नागपूरमध्ये मागील काही दिवसांपासून बिबट्याची दहशत पाहायला मिळत आहे. बिबट्याची दहशत आता पालघरमध्येही निर्माण झाली आहे. पालघरच्या विक्रमगड तालुक्यातल्या उटावली येथील आदर्श विद्यालयात पाचवीत शिकणाऱ्या मयंक विष्णु कुवरा (वय 11) या शाळकरी मुलावर जंगलातून घरी जाताना बिबट्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
शाळेतून परतताना बिबट्याचा हल्ला
मिळालेल्या माहितीनुसार, शाळा सुटल्यावर संध्याकाळी 5 वाजता मयंक सुमारे 4 किलोमीटर अंतर पायी, जंगलमार्गे आपल्या माले पाडवी पाडा येथे जात असताना अचानक बिबट्याने झडप घातली. हल्ला थेट मयंकच्या अंगावर होण्याऐवजी त्याच्या दफ्तरावर झाल्याने मोठा अनर्थ टळला. तरीही बिबट्याच्या नखांचे खोल घाव मयंकच्या शरीरावर उमटले.
(नक्की वाचा- Viral VIDEO: फोनवरचं बोलणं ऐकून Uber ड्रायवरने गाडी थांबवली अन्... तरुणीच्या आयुष्यभर लक्षात राहील असा क्षण)
पाचवीतील मुलांचा धाडस
सोबत असलेल्या इतर मुलांनी प्रसंगावधान राखत आरडाओरड आणि दगडफेक करून बिबट्याला पळवून लावले. या मुलांच्या धाडसाचे गावकऱ्यांनी कौतुक केले आहे. जखमी मयंकवर विक्रमगड ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असून खोल जखमांवर टाके घालण्यात आल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली.
परिसरात बिबट्या फिरत असल्याची चर्चा आधीच सुरू होती. काही नागरिकांनी सोशल मीडियावर बिबट्याचा व्हिडिओ टाकत सावध राहण्याचा इशारा देखील दिला होता. त्यामुळे उटावली, माले, कावळे परिसरात बिबट्याच्या वावरामुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world