Thane Rain: ठाण्यात पावसाची जोरदार बॅटिंग; शाळांबाबत जिल्हाधिकाऱ्यांचे प्रशासनाला महत्त्वाचे आदेश

Thane Rain News: ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागातील शाळांना सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे आणि स्थानिक परिस्थितीनुसार शाळा सुरू ठेवणे किंवा बंद ठेवण्याबाबत तात्काळ निर्णय घेण्याचे आदेश दिले आहेत.

जाहिरात
Read Time: 2 mins

मुंबई आणि उपनगरांसह संपूर्ण ठाणे जिल्ह्यात मान्सूनचा जोर कमालीचा वाढला आहे. प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबईने आगामी 5 दिवसांसाठी ठाणे जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत ठाणे जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील सर्व महानगरपालिका क्षेत्रातील आणि ग्रामीण भागातील शाळांसाठी महत्त्वाची नियमावली जारी केली आहे. अतिवृष्टीचा धोका लक्षात घेऊन स्थानिक पातळीवर शाळांना सुट्टी जाहीर करण्याचे अधिकार शिक्षण विभाग आणि तहसीलदारांना देण्यात आले आहेत.

हवामान विभागाचा 5 दिवसांचा अंदाज

प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबईने 1 जुलै रोजी जारी केलेल्या अधिकृत पत्रकानुसार, ठाणे जिल्ह्यात 1 ते 3 जुलैपर्यंत 'ऑरेंज अलर्ट' जारी करण्यात आला आहे.. या काळात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. 4 जुलै रोजी जिल्ह्यासाठी पावसाचा 'रेड अलर्ट' घोषित करण्यात आला आहे. यादिवशी काही भागांत अत्यंत मुसळधार ते अतिवृष्टीची दाट शक्यता आहे.

Advertisement

(नक्की वाचा-  VIDEO: त्र्यंबकेश्वरमध्ये चमत्कार! अमृतकुंडातील लुप्त झालेल्या प्राचीन शिवलिंगाचे अचानक दर्शन)

या पाच दिवसांच्या कालावधीत मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट, सखल भागात पाणी साचणे, पूरपरिस्थिती निर्माण होणे आणि वाहतूक विस्कळीत होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

शाळांच्या सुट्टीबाबत जिल्हा प्रशासनाचे महत्त्वाचे निर्देश

ठाणे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. संदिप माने यांनी ठाणे, नवी मुंबई, मिरा-भाईंदर, कल्याण-डोंबिवली, भिवंडी-निजामपूर आणि उल्हासनगर महानगरपालिकेचे शिक्षण उपायुक्त, जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी आणि सर्व तहसीलदारांना याबाबतचे अधिकृत आदेश जारी केले आहेत.

(नक्की वाचा-  हार्दिक पांड्या चेन्नई सुपर किंग्समध्ये जाणार? आयपीएल ट्रेडच्या चर्चांवर 'CSK'च्या सीईओंचे स्पष्टीकरण)

विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सुरक्षेचा विचार करून संबंधित शाळा व्यवस्थापनाने स्थानिक हवामानाचा व पूरपरिस्थितीचा सातत्याने आढावा घ्यावा. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होण्याची शक्यता असल्यास प्रत्यक्ष परिस्थितीचा विचार करून शाळा सुरू ठेवणे अथवा बंद ठेवणे याबाबतचा निर्णय स्थानिक स्तरावर तात्काळ घ्यावा, असं निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. 
 

Topics mentioned in this article