प्रविण वाकचौरे, NDTV मराठी
ठाणे आणि नवी मुंबई दरम्यान रोज प्रवास करणाऱ्या लाखो वाहनधारकांसाठी एक अत्यंत दिलासादायक बातमी आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (MMRDA) ठाणे पूर्वेकडील कोपरी ते नवी मुंबईतील पटनी दरम्यान खाडीवर एक नवीन 6 पदरी पूल उभारण्याच्या दिशेने अधिकृत पावले उचलली आहेत. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी एमएमआरडीएकडून मंगळवारी निविदा मागवल्या आहेत.
हा प्रस्तावित 1.4 किलोमीटर लांबीचा पूल सध्या अस्तित्वात असलेल्या ऐरोली-मुलूंड खाडी पूल आणि कळवा खाडी पुलावरील वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी मैलाचा दगड ठरणार आहे. या पुलामुळे गर्दीच्या वेळी दोन्ही शहरांमधील प्रवासाचा वेळ कमालीचा वाचणार आहे.
ठाणे स्टेशन ते ठाणे-बेलापूर रोड थेट कनेक्टिव्हिटी
हा नवीन पूल ठाण्यातील मिठ बंदर रोडवरून (कोपरी) सुरू होईल, जो ठाणे रेल्वे स्टेशनपासून अवघ्या 750 मीटर अंतरावर आहे. तिथून पुढे ठाणे खाडी ओलांडून हा पूल नवी मुंबईतील ऐरोली नॉलेज सिटी रोडजवळ (पटनी) उतरेल. यामुळे ठाणे स्टेशन रोड आणि अत्यंत गजबजलेला ठाणे-बेलापूर रोड कॉरिडॉर थेट जोडले जाणार आहेत.
(नक्की वाचा- Pune-Shirdi Railway: साईभक्तांसाठी खुशखबर! पुणे-शिर्डी पहिली थेट रेल्वे सेवा 17 जूनपासून सुरू)
प्रकल्पाची ठळक वैशिष्ट्ये आणि डिझाईन
हा पूल आधुनिक 'केबल-स्टेड' तंत्रज्ञानाचा वापर करून उभारला जाणार आहे. पुलाचे काम पूर्ण होण्यासाठी सुमारे साडेतीन वर्षांचा कालावधी अपेक्षित असून, 2030 पर्यंत हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात
आले आहे. केबल-स्टेड डिझाईनमुळे हा पूल दिसायला अतिशय आकर्षक असेल आणि नवी मुंबई विमानतळाकडून ठाण्यात प्रवेश करणाऱ्या प्रवाशांसाठी हे एक मुख्य प्रवेशद्वार ठरेल.
वाहतुकीचा ताण कमी होणार
एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ठाणे-बेलापूर रोड परिसरात आयटी पार्क्स (IT Parks) आणि औद्योगिक क्षेत्राचा झपाट्याने विकास झाला आहे. तसेच हा मार्ग जेएनपीटी (JNPT), नाशिक हायवे आणि इतर महत्त्वाच्या केंद्रांना जोडतो.
(नक्की वाचा- School Time: राज्यातील शाळांची वेळ बदलणार? ॲक्टिव्ह टीचर्स फोरमने शिक्षणमंत्र्यांकडे काय केली मागणी?)
वाहतूक अभ्यासानुसार, सध्या दररोज सुमारे 51 हजार वाहने ठाणे-बेलापूर रस्त्याचा वापर करतात, तर 30 हजार हून अधिक वाहन ऐरोली-मुलुंड पुलावरून प्रवास करतात. भविष्यातील मागणी लक्षात घेता, या नवीन पुलावरून गर्दीच्या वेळी ताशी 1900 पेक्षा जास्त वाहने धावू शकतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
हा पूल केवळ दोन शहरांना जोडणार नसून तो एका मोठ्या वाहतूक नेटवर्कचा भाग असणार आहे. भविष्यात हा पूल प्रस्तावित 'ठाणे कोस्टल रोड' आणि सिडकोच्या उन्नत मार्गाला जोडला जाईल.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world