ठाणे शहराला भेडसावणाऱ्या मूलभूत समस्यांसाठी आता विरोधी पक्षांनी कंबर कसली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि मनसे यांनी एकत्र येऊन भ्रष्टाचार, पाणीटंचाई आणि रस्त्यांच्या दुर्दशेविरोधात एल्गार पुकारला आहे. मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी या मोर्चाच्या निमित्ताने थेट सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केला.
नक्की वाचा: शिंदे गटाच्या नेत्यावर ड्रायव्हरनेच केला चाकू हल्ला, भर रस्त्यात जोरदार राडा, कारण...
टँकर माफियांचा उच्छाद, रस्त्यांमुळे ठाणेकरांना ताप
जाधव यांनी ठाण्यातील समस्यांची यादीच समोर ठेवली. "ठाण्यात प्रश्नांची कमतरताच नाहीये," असे ते म्हणाले. "ठाण्यातील वाहतूक कोंडी इतकी गंभीर आहे की, शहरात घोडबंदर किंवा शीळ फाटा कुठूनही यायचं असेल तर लोकांना 2-3 तास लागतात. यासोबतच ठाणेकरांना पाणीप्रश्न आणि टँकर माफियांनी हैराण केले आहे. काही सोसायट्यांना पाण्यासाठी 2 महिन्यांचे 35−40 लाख रुपये बिल भरावे लागत आहे, यावरून पाणी माफिया किती सक्रिय आहेत हे स्पष्ट होते." असे जाधव यांनी म्हटले.
ठाणे भ्रष्टाचाराची, गद्दारीची राजधानी झालीय!
ठाण्याला एकनाथ शिंदे यांच्या रुपाने मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पद लाभले, पण दुसरीकडे शहराच्या मूलभूत गरजा पूर्ण झाल्या नाहीत असे अविनाश जाधव यांचे म्हणणे आहे. "नवी मुंबईला स्वतःचे धरण बांधता आले, पण ठाण्याला धरण बांधता आले नाही," असे म्हणत त्यांनी सत्ताधाऱ्यांच्या उदासीनतेवर बोट ठेवले. आज ठाण्याची ओळख "गद्दारी आणि भ्रष्टाचाराची राजधानी" म्हणून झाली आहे. हा कलंक लवकरच पुसून काढू, असे जाधव यांनी म्हटले.
नक्की वाचा: मंदिरावरून राजकीय धमासान! हिंदूत्ववादी म्हणवणारे पक्षच आपसात भिडले, प्रकरण काय?
भ्रष्टाचाराची मुळे कुठे जातात हे ठाणेकरांना माहिती आहे!
जाधव यांनी ठाण्यात भ्रष्टाचार बोकाळल्याचाही आरोप केला. ते म्हणाले की, 'वसई विरारला आयुक्ताच्या घरी घबाड सापडले, मीरा भाईंदरमधल्या आयुक्तांच्याही घरी घबाड सापडले होते, हे अधिकारी पूर्वी माजी मुख्यमंत्र्यांचे ओएसडी होते. या सगळ्या भ्रष्टाचाराची "मुळं एकाच वटवृक्षापाशी जातात," आणि हा वटवृक्ष कोण आहे हे ठाणेकरांना चांगलेच माहीत आहे, असे जाधव यांनी म्हटले. ठाण्यात बदल घडवण्यासाठी सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येणे गरजेचे आहे, तरच आपण तग धरू शकतो. त्यामुळे, ठाणेकरांनी या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होऊन, या भ्रष्टाचाऱ्यांचा पाडाव करावा, असे आवाहन अविनाश जाधव यांनी केले.