रिझवान शेख, प्रतिनिधी
March 3 lunar eclipse : यंदाच्या वर्षी होळी आणि धुळीवंदन कधी असेल याबाबत अनेक चर्चा सुरू आहेत. दरम्यान सोमवार 2 मार्च रोजी होलिका दहन करायचे असून धूलिवंदन मंगळवारी 3 मार्च रोजी असल्याचे पंचांगकर्ते, खगोल अभ्यासक दा.कृ.सोमण यांनी सांगितलं. दा.कृ.सोमण म्हणाले, की यावर्षी सोमवार 2 मार्च रोजी सायं. 5 वाजून 55 मिनिटांनी फाल्गुन पौर्णिमा सुरू होते. त्या दिवशी प्रदोष काळात पौर्णिमा आहे. तसेच मंगळवार 3 मार्च रोजी ग्रस्तोदित चंद्रग्रहण आहे. त्यामुळे धर्मसिंधूत सांगितल्याप्रमाणे पूर्वदिवशी म्हणजे सोमवार 2 मार्च रोजी होलिका दहन करावे. सोमवारी 2 मार्च रोजी सूर्यास्तानंतर प्रदोष काळात भद्राकालातही होलिका दहन करता येते हेही . दा.कृ.सोमण यांनी स्पष्ट केले.
साध्या डोळ्यांनीही चंद्रग्रहण पाहता येणार...
येत्या मंगळवारी 3 मार्च ग्रहणातच चंद्र उगवताना आपल्याला साध्या डोळ्यांनी पाहता येणार असल्याचे खगोल अभ्यासक, पंचांगकर्ते दा.कृ.सोमण यांनी सांगितले. चंद्रग्रहण हा एक नैसर्गिक अविष्कार आहे, तो सर्वांनी साध्या डोळ्यांनी पाहायला हवा. सध्या काही प्रसार माध्यमातून या चंद्रग्रहणाविषयी भीती पसरवली जात आहे, ती योग्य नाही. हे विज्ञानयुग आहे. शिक्षक-पालकांनी मुलांना चंद्रग्रहण दाखवून त्याविषयी माहिती करून द्यायला पाहिजे, असंही सोमण यावेळी म्हणाले.
जेव्हा चंद्रबिंब पृथ्वीच्या दाट छायेत येतं, तेव्हा चंद्रबिंब काळसर-लालसर रंगाचं दिसतं. पृथ्वीच्या ज्या भागात चंद्र दृश्य आकाशात असतो तेथून ते चंद्रग्रहण दिसते. मंगळवार 3 मार्च रोजी दुपारी 3.20 वाजता चंद्रग्रहणास प्रारंभ होईल. परंतू त्यावेळी चंद्र आपल्या दृश्य आकाशात असणार नाही. तो पूर्व क्षितिजाखाली असेल. वेगवेगळ्या ठिकाणांहून वेगवेगळ्यावेळी ग्रहणातच चंद्र उगवतांना दिसणार आहे. सायंकाळी 6.48 या एकाचवेळी ग्रहण सुटणार आहे. त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणांहून वेगवेगळ्या वेळी हे चंद्रग्रहण दिसणार आहे. मुंबई येथे चंद्रोदय सायंकाळी 6.45 वाजता होणार आहे. ग्रहण सायंकाळी 6.48 वाजता सुटणार आहे. म्हणजे मुंबईत फक्त 3 मिनिटे चंद्रग्रहण दिसणार आहे. तर पुण्यात जवळपास ७ मिनिटं चंद्रग्रहण दिसेल. पुणे सायंकाळी 6.41, नाशिक सायं. 6.40, कोल्हापूर सायं. 6.40, नागपूर सायं. 6.18, सोलापूर सायं. 6.33, रत्नागिरी सायं. 6.44, छ. संभाजी नगरमध्ये सायं. 6.34 वाजता चंद्रोदय होणार आहे. सर्वत्र चंद्रोदयापासून 6.48 पर्यंत चंद्रग्रहण दिसणार आहे. ग्रहणवेधकाळात धूलीवंदन करता येतं. होळीचा रंगांचा सण साजरा करता येतो, असं दा. कृ. सोमण यांनी सांगितलं.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world