
लोकसभा निवडणुकीची धामधूम आता संपली आहे. सर्वांना प्रतिक्षा आहे ती लोकसभा निवडणुकीच्या निकालाची. त्यात भाजपचे भुसावळचे आमदार संजय सावकारे यांना धमकीचा फोन आला आहे. त्यात त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. त्यामुळे भुसावळमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
भुसावळचे भाजपचे आमदार संजय सावकारे आणि त्यांच्या कुटुंबाला अज्ञात व्यक्तीने फोन करून जीवे मारण्याची धमकी दिली आहे. संजय सावकारे यांचे बंधू प्रमोद सावकारे यांच्या मोबाईलवर ही धमकी देण्यात आली. भुसावळ मध्ये घडलेल्या दुहेरी हत्याकांडातील माजी नगरसेवक संतोष बारसे यांच्या निवासस्थानी प्रमोद सावकारे हे सांत्वनासाठी गेले होते. त्यानंतर अज्ञात व्यक्तीकडून प्रमोद सावकारे यांच्या मोबाईलवर अनोळखी क्रमांकावरून धमकी देण्यात आली आहे. याप्रकरणी प्रमोद सावकारे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्ती विरुद्ध बाजारपेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान ही धमकी मागचे कारण अजून स्पष्ट झालेले नाही.
हेही वाचा -गोळीबारच्या घटनेमुळे भुसावळ हादरलं, माजी नगरसेवकासह दोघांची हत्या
भुसावळ शहरामध्ये माजी नगरसेवक संतोष बारसे आणि सुनील राखुंडे यांच्यावर अज्ञाताने गोळीबार करून हत्या केली होती. बुधवारी 29 मे 2024 रात्री ही घटना घडली. या घटनेमुळे शहरामध्ये तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. तसेच पुन्हा एकदा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. पोलीस बंदोबस्तामध्ये या दोघांचेही मृतदेह पोस्टमार्टेमसाठी जळगावमधील जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. त्यानंतर मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. याच बारसे यांच्या घरी सांत्वनासाठी सावकारे गेले होते. त्याच वेळी त्यांना धमकी देण्यात आली.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world