रामराजे शिंदे, नवी दिल्ली
माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत रोहित पवार सातत्याने धक्कादायक खुलासे करत असल्याने त्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे, असा दावा पक्षाचे प्रवक्ते सुनील माने यांनी केला आहे. त्यामुळे रोहित पवार यांना झेड प्लस सुरक्षा पुरवावी अशी मागणी सुनील माने यांनी केली यआहे.
"माहिती लोकांपर्यंत पोहोचू नये म्हणून दबाव"
सुनील माने यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, "अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर रोहित पवारांनी जे मुद्दे उपस्थित केले आहेत, त्यातून अनेक धक्कादायक गोष्टी समोर येत आहेत. ही माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचू नये, असे काही घटकांना वाटते. आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार, अशा लोकांपासून रोहित पवारांना धोका असू शकतो."
(नक्की वाचा- Ajit Pawar News: घात की अपघात? अजित पवारांच्या विमान अपघाताचं गुढ उलगडणार? सरकारचा मोठा निर्णय)
व्यावसायिक हितसंबंधांचा संशय
सुनील माने यांनी या प्रकरणात केवळ राजकीय नव्हे, तर व्यावसायिक लोकांचा समावेश असण्याची शक्यता वर्तवली आहे. विशेषतः विमान कंपनी (VSR) आणि त्याशी संबंधित असलेल्या मोठ्या आर्थिक हितसंबंधांमुळे रोहित पवारांना लक्ष्य केले जाऊ शकते, असा संशय व्यक्त केला जात आहे.
मुख्यमंत्र्यांना देणार निवेदन
रोहित पवारांच्या सुरक्षेसाठी पक्षाचे आमदार आणि पदाधिकारी लवकरच मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. या भेटीत रोहित पवारांना तातडीने 'झेड प्लस' सुरक्षा प्रदान करावी, अशी मागणी लेखी निवेदनाद्वारे केली जाणार आहे, असं सुनील माने यांनी सांगितलं.
(नक्की वाचा- Crime News: बदलापुरात खळबळ! चित्रकला स्पर्धेचं आमीष दाखवून पालकांसह मुलांना बोलावलं अन्...)
तपासाची व्याप्ती वाढतेय
रोहित पवारांनी यापूर्वीच VSR कंपनीच्या अनियमितता, ब्लॅक बॉक्सचा संशय आणि आयटी सेलकडून होणारे ट्रोलिंग यावर सविस्तर भाष्य केले आहे. या प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी, अशी शिफारस राज्य सरकारने आधीच केली आहे. मात्र, आता रोहित पवारांच्या सुरक्षेचा मुद्दा आल्याने या प्रकरणातील तणाव अधिकच वाढला आहे.