सुनिल दवंगे, शिर्डी
गोदावरी नदीत पडून एक वृद्ध महिला आणि दोन युवकांचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी घडली. दुचाकीवरुन जाताना कमलापूर बंधाऱ्यावर तोल जाऊन चौघेजण नदीपात्रात पडले होते. चौघांपैकी तीन मृतदेह शोधण्यात 24 तासानंतर पोलिसांना यश आले आहेत. एकाला काल संध्याकाळीच मच्छीमारांनी वाचवलं होतं.
दसऱ्याच्या दिवशी सायंकाळी गोदावरी नदीवरील कमलापूर बंधाराऱ्यावरुन एकाच दुचाकीवरून जाणाऱ्या चौघांचा तोल जाऊन गोदावरी नदीच्या पाण्यात पडले होते. यातील एकाला नदीत मासे पकडणाऱ्या तरुणांनी वाचवले. तर इतर मृतांपैकी एका वृद्धेचा मृतदेह रात्रीच सापडला होता तर दोन जण बेपत्ता होते. आज सकाळपासून त्यांचा शोध सुरु होता. मोठ्या प्रयत्नाने दोन मृतदेह शोधण्यात आले.
कमालपुर येथील आदिवासी समाजातील दिलीप सोमनाथ बर्डे, रवी सोमनाथ बर्डे आणि यनुबाई मनोहर बर्डे अशा बंधाऱ्यातील पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. तर मच्छिंद्र गोपीनाथ बर्डे याला वाचवण्यात यश आलं आहे.
कमालपूरवरून बंधाऱ्यवरुन जाताना मधोमध आल्यानंतर बंधाऱ्यावरील खड्ड्यामुळे दुचाकीस्वराचा तोल गेला. बंधाऱ्याला संरक्षक कठडे नसल्याने दुचाकीवरील हे चौघेही नदीत पडले. पडताना त्यांना बंधाऱ्यातील लोखंडी ढाप्यांचा मार लागला असल्याची शंका व्यक्त केली जात आहे. यावर्षी जायकवाडी धरण पूर्ण क्षमतेने भरले असून यातील पाण्याचा फुगवटा कमालपूर बंधाऱ्यापर्यंत आलेला आहे. त्यामुळे बंधाऱ्यात मोठ्या प्रमाणावर पाणी आहे.